नागपूर जिलह्यातील कळमेश्वर येथील गोदामातून ट्रक (क्रमांक एमएच ४० वाय ७८३८) मध्ये गोदरेज कंपनीचे कॉस्मेटिक उत्पादनाचे ६२९ कार्टून ट्रकमध्ये भरण्यात आले. २७ जानेवारीला हा ट्रक नागपूर येथून छत्तीसगढ राज्यातील रायपूरकडे जाण्यास निघाला. दरम्यान, सेंदुरवाफा टोलनाक्यावर या ट्रकची ताडपत्री फाटल्याचे दिसून आले. चालक ताराचंद कल्लूपाल (३२ रा. भिका गर्गापूर, उत्तरप्रदेश) याने पाहणी केली असता ट्रकमधील दहा लाख रुपयांचे कॉस्मेटिक साहित्य चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्याने ही बाब देवरी येथून मोबाईलवरून ट्रक मालक आशिष गोविंदप्रसाद मिश्रा (रा. नागपूर) यांना दिली. त्यांनी डुग्गीपार पोलीस ठाणे गाठून तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, हद्दीच्या वादात तक्रार घेण्यास सुरुवातीला नकार देण्यात आला. तब्बल सहा दिवसांनंतर अखेर जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
बॉक्स
पाेलीस ठाण्याचा हद्दीचा वाद
राष्ट्रीय महामार्गावर एखादी घटना घडली की, सुरुवातीला पोलीस ठाण्याच्या हद्दीचा विषय निघतो. धावत्या ट्रकमधील चोरी प्रकरणात तर सर्वच पोलीस ठाणे हात वर करतात. आशिष मिश्रा यांनी घटना घडल्यानंतर २८ जानेवारीला गोंदिया जिल्ह्यातील डुग्गीपार पोलीस ठाणे गाठून तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना आमच्या हद्दीत प्रकरण येत नसल्याचे सांगून परत केले. साकोली, लाखनी पोलीस ठाण्यातही त्यांनी तक्रार देण्याचा प्रयत्न केला. अखेर आठ दिवसांनंतर जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. यापूर्वी अशीच घटना घडली होती. त्यावेळी कारधा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली होती.