भंडारा : अफगाणिस्तानात तालिबानचा झेंडा रोवल्यानंतर तिथे चांगलाच तणाव वाढला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर याचा परिणाम वाढला असून, तेथून आयात होणारे ड्रायफ्रूट्सही भारतात महागले आहे. परिणामी, स्थानिक बाजारपेठेतही याचे परिणाम जाणवायला लागले आहेत. दरम्यान, नागरिक स्थानिक किंवा राज्य अंतर्गत मिळणारे ड्रायफ्रूट्सला पसंती देत असल्याचे समजते.
अफगाणिस्तानातून आयात होणाऱ्या ड्रायफ्रूट्समध्ये जवळपास ४० ते ४५ टक्क्यांनी भाववाढ झाल्याचे दिसून येते. त्यामुळेही ग्राहकांनी तेथून येणाऱ्या ड्रायफ्रूट्सची मागणी कमी केली आहे. भंडारा जिल्ह्यात ड्रायफ्रूट्सची दुकाने आहेत. मात्र त्यात आयात केलेले साहित्य कमी प्रमाणातच दिसून येते.
बॉक्स
ड्रायफ्रूट्सचा स्टॉक चांगला
भंडारा जिल्ह्यात ठिकठिकाणी ड्रायफूट्सची अनेक दुकाने आहेत. विशेषतः भंडारा शहरात ड्रायफ्रूट्सची अनेक दुकाने आहेत. त्यापैकी काही नामांकित दुकानांमध्ये ड्रायफ्रूट्सचा चांगला साठा उपलब्ध आहे. ड्रायफ्रूट्स थोडेफार महागले तरी ग्राहकांनी स्थानिक ड्रायफ्रूट्सला मागणी केल्याचे अधिक दिसून येते. अंजीर, किसमीश, पिस्ता, पेंडखजूर, काजू यासह अन्य ड्रायफ्रूट्सचीही मागणी वाढली आहे.
बॉक्स
दर पूर्ववत होणे कठीण
अफगाणिस्तानात तणाव वाढल्याने भारतात येणाऱ्या ड्रायफ्रूट्सच्या दरांत ४० ते ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. परिणामी, स्थानिक पदार्थांमध्येही थोडीफार वाढ झाल्याचे दिसून येते. सध्या सणासुदीचा काळही सुरू झाला आहे. अशा स्थितीत ड्रायफ्रूट्सला मोठी मागणी असते. किंबहुना अन्य देशांतून येणाऱ्या पदार्थांचे भाव वाढले की स्थानिक बाजारपेठेवरही त्याचा परिणाम जाणवतो. मात्र नागरिकांकरवी मागणीत घट झालेली सध्या तरी दिसून येत नाही. देशांतर्गत मिळणाऱ्या ड्रायफ्रूट्सची मागणी अधिक असल्याचे समजते. सध्यातरी वाढलेले दर कमी होतील याची शाश्वती नाही.
- एक ड्रायफ्रूट विक्रेता.