ज्ञानेश्वर मुंदे।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अभ्यास कर, शिक्षण घेत पुढे जा, स्वत:च्या पायावर उभी रहा, असा कानमंत्र देणाऱ्या वडिलांचा कर्करोगाने मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी दहावीचा पेपर. घरात त्यांचे पार्थिव. अशा शोकाकूल वातावरणात त्यांंच्या पार्थिवाजवळ बसून रात्रभर अभ्यास केला. वडिलांच्या मृत्यूचे दु:ख हृदयात ठेवत दुसऱ्या दिवशी दहावीचा पेपर दिला. पेपर सोडविल्यानंतर तिने आपल्या लाडक्या पित्याला अखेरचा निरोप दिला. ही घटना आहे लाखांदूर तालुक्याच्या खैरी (पट) येथील.प्रणाली खेमराज मेश्राम ही लाखांदूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाची दहावीची विद्यार्थिनी. वर्षभर दहावीचा अभ्यास केला. एस.टी. महामंडळात चालक असलेले वडील खेमराज मेश्राम मुलीला अभ्यासासाठी प्रोत्साहित करायचे. अभ्यास कर, स्वत:च्या पायावर उभी राहा असे ते नेहमी मुलीला सांगायचे. वडिलांच्या कष्टाचे चीज करण्यासाठी प्रणाली ही मेहनतीने अभ्यास करू लागली. अचानक खेमराज यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले. ब्रम्हपुरी, नागपूर येथे उपचार सुरु होते. त्यांना कर्करोग झाल्याचे माहित होताच प्रणालीसह संपूर्ण कुटूंब धास्तावले. अशाही परिस्थितीत तिने दहावीचा अभ्यास सुरुच ठेवला. अशातच सोमवार ४ मार्च रोजी रात्री ८ वाजता खेमराजवर काळाने झडप घातली. त्यांचे निधन झाले. खैरी पट येथील घरी पार्थिव आणण्यात आले. प्रणालीचा दुसऱ्या दिवशी दहावीचा इंग्रजीचा पेपर होता. वडिलांच्या निधनाने दु:खाचा डोंगर कोसळला. सदैव धीर देणारे वडीलच अचानक सोडून गेल्याने प्रणाली कोलमडून पडली.खेमराज मेश्राम यांच्या निधनाची माहिती मिळताच जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.के. खोब्रागडे, आर.एम. मुळे, शिक्षक संजय प्रधान, एस.डब्लू. दिवटे प्रणालीच्या घरी पोहचले. प्रणालीला त्यांनी धीर दिला. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दहावीचा पेपर देण्याचा सल्ला दिला. प्रणालीने जड अंतकरणाने हा सल्ला मानत रात्रभर त्यांंच्या पार्थिवाजवळ बसून अभ्यास केला. मंगळवारी सकाळी मृत्यूचे दु:ख हृदयात ठेवून दहावीच्या परीक्षेला गेली. इंग्रजीचा पेपर सोडवून गावी परत आली. त्यानंतर आपल्या लाडक्या वडिलांना तिने आणि गावकऱ्यांनी अखेरचा निरोप दिला. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण उच्च शिक्षण घेणार असे तिने डबडबत्या डोळ्यांनी सांगितले तेव्हा उपस्थितांच्या डोळ्यालाही अश्रूधारा लागल्या होत्या.
दहावीची परीक्षा; वडिलांच्या पार्थिवाजवळ बसून केला रात्रभर अभ्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2019 2:55 PM
अभ्यास कर, शिक्षण घेत पुढे जा, स्वत:च्या पायावर उभी रहा, असा कानमंत्र देणाऱ्या वडिलांचा कर्करोगाने मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी दहावीचा पेपर. घरात त्यांचे पार्थिव. अशा शोकाकूल वातावरणात त्यांंच्या पार्थिवाजवळ बसून रात्रभर अभ्यास केला.
ठळक मुद्देपेपर सोडविल्यानंतर लेकीने दिला अखेरचा निरोप