अमानुष खून : जिल्हा व सत्र न्यायालयात सोनी हत्याकांड सुनावणीला प्रारंभलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तीन वर्षांपूर्वी तुमसर शहरातील सराफा व्यापारी संजय सोनी यांच्या घरी दरोडा घालुन सोनी यांच्यासह त्यांची पत्नी व मुलाचा निर्घृण खून केला होता. या हत्याकांड प्रकरणाची सुनावणी सोमवारला जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती जवळकर यांच्या न्यायालयात सुरू झाली आहे. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली असून ते आज न्यायालयात उपस्थित होते. आज पहिल्या दिवशी दोन साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. आरोप असलेल्या सात जणांपैकी सहा जणांच्या वकिलांनी उलट तपासणी केली. सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या न्यायालयीन कार्यवाहीत सर्वात आधी मृतक संजय सोनी (४७) यांची पुतणी आर्ची सोनी यांची साक्ष नोंदविण्यात आली. आर्चीने साक्षीत सांगितले की, २६ फेब्रुवारी २०१४ च्या रात्री ११ वाजताच्या सुमारास काका संजय सोनी यांच्या चारचाकी वाहनाच्या हॉर्नचा आवाज ऐकला. १५ मिनिटांनी परत ‘रिव्हर्स हॉर्न’चा आवाज ऐकला. यानंतर मी झोपी गेले. दुसऱ्या दिवशी म्हणजेच २७ फेब्रुवारीला सकाळी १०.१५ च्या सुमारास आर्चीच्या आईने संजय सोनी यांच्या घरी फोन केला. फोन न उचलल्याने आईने आर्चीला काका संजय सोनी यांच्याकडे पाठविले. यात आर्ची काकांच्या घराकडे गेली. त्यावेळी घराचा गेट बंद होता. बाहेरून आवाज दिला, परंतु कुणी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आत जाण्यासाठी निघाले असता गेट सुरू होता. मुख्य दरवाजापाशी येऊन परत काका व काकूला आवाज दिला. त्यावेळीही प्रतिसाद न मिळाल्याने घरात प्रवेश केला. यावेळी तिला काका संजय सोनी यांचा मृतदेह दिसला. स्वयंपाक खोलीत द्रुमिलचा (११) मृतदेह तर बेडरूममध्ये काकू पुनम सोनी (४३) यांचा मृतदेह दिसून आला. तिघांच्याही मानेवर गळफास लावल्याचा खुणा होत्या. याची माहिती आर्चीने तिचे वडील विजय सोनी व आईला दिली. सोबतच तरूण सोनी यांनाही माहिती दिली.यानंतर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आल्याची साक्ष दिली. अकोला येथे मामाच्या गावाला गेलेली चांदणी संजय सोनी ही परत येऊन चोरी गेलेल्या सोने-चांदीच्या दागिण्यांची माहिती दिली. यात ३० लाख रूपये रोख, सहा किलो सोन्याचे दागिणे चोरीला गेल्याचे सांगितले. त्यानंतर तरूण सोनी यांची साक्ष नोंदविण्यात आली. यात त्यांनी त्यांनीही २७ फब्रुवारी २०१४ रोजी घडलेल्या घटनेचा तपशील साक्षी दरम्यान सांगितला. या दोघाही साक्षीदारांना विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रश्न विचारून घटनेची माहिती जाणून घेतली. सातही आरोपी न्यायालयात हजर या हत्याकांडात सहभागी असलेले महेश आगाशे, रा.तुमसर, सलीम नजीर खान पठाण रा. तुमसर, शाहनवाज उर्फ बाबू सत्तार शेख रा.तुमसर, राहुल रफी शेख रहमान रा. ताजबाग, नागपुर, मोहम्मद अफरोज उर्फ सोहेल युसूफ शेख रा. ताजबाग व केशरी ढोले रा.तुमसर व अन्य एक असे एकूण सातही जणांना आज न्यायालयात कडेकोट बंदोबस्तात हजर करण्यात आले होते. आरोपींविरुद्ध भादंवि ३०२ खून करणे, ३९६ खुनासह दरोडा, ४४९ मृत्यूच्या शिक्षेचा गुन्हा करण्याकरिता गृहप्रवेश, १२० फौजदारी कट रचणे, २०१ पुराने नष्ट करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल आहे. सातपैकी सहा जणांच्या वकिलांनी दोन्ही साक्षीदारांची उलटतपासणी केली. केशरी ढोले याने स्वत: उलटतपासणी करणार असल्याचे न्यायालयाला सांगितले. उद्या मंगळवारलाही सुनावणी होणार आहे.
पुतणी आर्ची व तरूण सोनीची नोंदविली साक्ष
By admin | Published: June 20, 2017 12:14 AM