लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा/ साकाेली : पावसाने मारलेली दडी, वातावरणात निर्माण झालेला प्रचंड उकाडा आणि वातावरणातील बदलाने जिल्ह्यात कीटकजन्य आजाराने थैमान घातले आहे. गावागावांत रुग्ण असून, काेराेना संसर्गामुळे नागरिक उपचारासाठीही पुढे येत नाहीत. त्यातच जिल्ह्यात डेंग्यूची लागण झाल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात ५५२ नमुने तपासले असता डेंग्यूचे ३६ रुग्ण आढळून आले आहेत, तर मलेरियाचे सात रुग्ण आढळले आहेत. शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयात रुग्णांची गर्दी झाल्याचे दिसत आहे.भंडारा जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या नियंत्रणात असली तरी साथीच्या आजाराने डाेके वर काढले आहे. गत तीन आठवड्यांपासून पाऊस बेपत्ता झाला आहे. वातावरणात प्रचंड उकाडा आहे. त्यामुळे साथीचे आजार पसरण्यास पाेषक वातावरण निर्माण झाले आहे. ताप, सर्दी, खाेकला आदींचे रुग्ण गावागावांत दिसत आहेत. काेराेनाच्या भीतीमुळे अनेक जण उपचारासाठी रुग्णालयात जात नाहीत. औषधी दुकानातून गाेळ्या आणून स्वत:च उपचार करताना दिसत आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. ताप जास्त झाल्यानंतर मग रुग्णालयात धाव घेतली जाते.भंडारा जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत ५५२ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले हाेते. त्यात डेंग्यूचे ३६ रुग्ण आढळून आले आहेत, तर मलेरियाचे ७ रुग्ण आढळलेत.
आजारासाठी पाेषक वातावरण- जिल्ह्यात सध्या वातावरणातील बदलाने कीटकजन्य आजारासाठी पाेषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे गावागावांत रुग्ण आढळून येत आहेत. साकाेली तालुक्यासह इतर तालुक्यांतही डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. डेंग्यूसाठी कारणीभूत असलेल्या इडीस इजिप्ती या डासाची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात हाेते. त्यामुळे नागरिकांनी घराच्या आसपास आणि घरात पाणी साचले असेल, तर ते रिकामे करावे, कूलर फुलदाण्या यामध्ये असलेले पाणी वारंवार बदलावे, आठ दिवसांपेक्षा जास्त काळ पाणी ठेवू नये, मच्छरदाणीचा वापर करावा, असे आवाहन साकाेली तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. आर.टी. नंदेश्वर यांनी केले आहे.
साकोली तालुक्यात डेंग्यूचे ११ रुग्ण- साकोली तालुक्यात डेंग्यूसदृश तापाचे ११ रुग्ण आढळून आले असून त्यात खंडाळा व सासरा येथे प्रत्येकी पाच, तर चांदोरी येथे एक रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. रुग्णावर सानगडी व एकोडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. साकोली तालुक्यात मोठ्या प्रमाणात साथीच्या आजाराची लागण झाली असून, डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. १ सप्टेंबरपर्यंत तालुक्यात डेंग्यूचे ११ रुग्ण आढळून आले. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. तीव्र ताप, अंगदुखी, सर्दी, खोकला, आदी लक्षणे आढळून येत आहेत. डेंग्यूमुळे रक्तपेशी कमी होऊन रुग्णाच्या शरीरात अंतर्गत रक्तस्राव होऊन मृत्यू होण्याची शक्यता असते. तालुका आरोग्य विभागाच्यावतीने गावात खबरदारीची उपाययोजना सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्याने नागरिकांनी याेग्य खबरदारी घ्यावी. डासाची उत्पत्ती कमी करण्यासाठी प्रयत्न करावे, नागरिकांनी घाबरुन न जाता रुगणालयात जावून तपासणी करावी.- डाॅ. आदिती त्याडी, जिल्हा हिवताप निर्मूलन अधिकारी