राजू बांते
मोहाडी (भंडारा) : अधीक्षकांना माहीत आहे. त्यांना विचारून घ्या. अधीक्षक व एक कार्यालयातील कर्मचारी इकडे -तिकडे फिरतात. घामाघूम होतात. पण, त्या फलकाचा ठावठिकाणा लागत नाही. आता तो फलक कुठे गडप झाला, याचा शोध लावणे सुरू आहे. हा प्रकार आहे मोहाडी पंचायत समितीमधील फलकाचा. बेफिकीर वृत्तीमुळे गटविकास अधिकाऱ्यांचा कार्यकाळ दर्शविणारा फलकच बेपत्ता झाल्याचे प्रकर्षाने दिसून आले.
पंचायत समितीमधील गटविकास अधिकारी यांच्या दालनातील रंगरंगोटी एक वर्षाआधी करण्यात आली. बाहेरच्या ओसरीतील रंगरंगोटी दोन महिन्यांपूर्वी केली गेली. गटविकास अधिकाऱ्यांच्या खोलीतील व बाहेरच्या व्हरांड्यातील सर्व फलक काढण्यात आले होते. त्यात गटविकास अधिकाऱ्यांचा कार्यकाळ दर्शविणारा तक्तासुध्दा काढण्यात आला होता. तीन - चार वर्षांपासून मोहाडी पंचायत समितीला नियमित गटविकास अधिकारी मिळाला नाही. प्रभारींवर सगळा कारभार सुरू आहे. प्रभारी गटविकास अधिकारी पल्लवी वाडेकर यांना गटविकास अधिकाऱ्यांचा कार्यकाळ तक्ता कुठे आहे, अशी विचारणा केली. त्या म्हणाल्या, राजेश मडकाम यांच्याकडून माहिती मिळेल. त्यांनी तो फलक शोधण्यास सुरुवात केली. पण, गटविकास अधिकारी यांचा २४ जानेवारी २०११नंतर कोण गटविकास अधिकारी होते, ही माहिती दर्शविणारा तक्ता गायब झाला होता. त्याचा शोध घेता - घेता सगळे घामाघूम झाले. दिवसभर शोधूनही सापडला नाही. उलट, काही धक्कादायक बाबी समोर आल्या.
गटविकास अधिकाऱ्यांच्या खोलीला लागून सहाय्यक गटविकास अधिकारी यांची खोली आहे. सहाय्यक गटविकास अधिकारी असलेल्या पल्लवी वाडेकर या प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून कारभार बघत आहेत. त्यामुळे सहाय्यक गटविकास अधिकारी यांची खोली अडगळीसारखी झाली आहे. तसेच रंगरंगोटीसाठी काढलेल्या थोर नेत्यांचे फोटो व विविध फलक ठिकठिकाणी अस्ताव्यस्त पडून असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
अस्ताव्यस्त पडून आहेत फलक
व्हरांड्याच्या कडेला माहिती अधिकार, सहाय्यक गटविकास अधिकारी, मानवी हक्क आदी फलक, तर लेखा विभागात गटविकास अधिकाऱ्यांचा फलक, आस्थापना विभागात फोटो तसेच सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात काही फलक अस्ताव्यस्त पडून आहेत.