अड्याळ(भंडारा) : अड्याळ पोलीस ठाणे हद्दीतील कलेवाडा शेतातील धुऱ्यावर एका ४५ वर्षीय शेतकऱ्याचा संशयास्पदरीत्या मृतदेह आढळला. प्रदीप मंगर टेंभुर्णे रा. कलेवाडा असे मृताचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास उघडकीला आली. डोक्याला व गुप्तांगावर मार असल्याने घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
माहितीनुसार प्रदीप टेंभुर्णे हे नेहमीप्रमाणे घरातून जेवण करून शनिवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास शेतात कापून ठेवलेला गहू, चना, जवस पिकाची चोरी होऊ नये म्हणून जागलीकरिता गेले होते. पहाटेच्या सुमारास ते घरी यायचे. परंतु रविवारी सकाळी वडील का आले नाही, यासाठी मुलगा ज्ञानदीपने शेत गाठले. मचानाच्या खाली धुऱ्यावर वडील दिसताच मुलाने आधी आवाज मारला. पण वडील काहीच बोलत नसल्याने मुलाने आरडाओरड केली. आजूबाजूचे शेतकरी घटनास्थळी दाखल झाले. ही माहिती वाऱ्यासारखी गावात पसरताच माजी सरपंच मोहन घोगरे यांनी अड्याळ पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलीस घटनास्थळी आले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी अड्याळ ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.
घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी रीना जनबंधू यांनी भेट दिली. यावेळी ठाणेदार सुशांत पाटील व समस्त अड्याळ पोलीस कर्मचारी उपस्थित होते. घटनास्थळी फॉरेन्सिक टीम, श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. शेतात दोन ते तीन फुटांवर झोपण्याची जागा (मारा) तयार करण्यात आला होता. मृतदेह त्या माराखाली म्हणजे शेतातील धुऱ्यावर आढळून आला. डोक्यावर व गुप्तांगावर मारहाणीच्या जखमा आढळल्या.