भंडारा : ‘रेस्ट इन पीस’ असे व्हाॅट्सॲप स्टेटस ठेवून वैनगंगा नदीत गत रविवारी उडी घेणाऱ्या तरुणाचा आठ दिवसांच्या शोधमोहिमेनंतर मोहाडी तालुक्यातील कुरूडा येथील वैनगंगा नदीपात्रात रविवारी सायंकाळी मृतदेहच आढळला. आयटीआयच्या प्रात्यक्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने त्याने तालुक्यातील माडगी येथे नदीपात्रात उडी घेतली होती. सोमवारी सकाळी शोकाकूल वातावरणात डोंगरला घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अनुराग विजय गायधने (१७, रा. शहर वार्ड, तुमसर) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो तुमसरच्या न्यू तुलसी खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत वीजतंत्री या शाखेत शिकत होता. अखिल भारतीय व्यवसाय शिक्षण मंडळाने घेतलेल्या प्रात्यक्षिक परीक्षेत तो अनुत्तीर्ण झाला होता. निकालाची माहिती शनिवारी त्याला माहिती मिळाली. त्यामुळे तो प्रचंड मानसिक तणावात आला. रविवारी पहाटेच्या सुमारास सायकलने माडगी येथे वैनगंगा नदी पात्राजवळ आला. तत्पूर्वी आपल्या व्हाॅट्सॲपवर ‘रेस्ट इन पीस’ असे स्टेटस ठेवले होते. हा प्रकार माहीत होताच घरच्यांनी शोध सुरू केला. पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
अनुरागचे मोबाईल लोकेशन वैनगंगा नदीपात्र दाखवित होते. त्यामुळे पोलिसांनी रविवारपासून शोधमोहीम सुरू केली. तुमसर पोलिसांनी संपूर्ण वैनगंगा नदी पात्र पालथे घातले. परंतु त्यांचा थांगपत्ता लागत नव्हता. परंतु अखेर रविवारी सायंकाळच्या सुमारास मोहाडी तालुक्यातील कुरुडा येथील नदीपात्रातील एका तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्या नातेवाईकांना बोलावून मृतदेहाची ओळख पटविली. तेव्हा तो मृतदेह अनुरागचा असल्याचे पुढे आले, अशी माहिती देव्हाडी पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक तुकाराम गभने यांनी दिली. सोमवारी डोंगरला घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
ताई मला माफ कर
अनुरागचे वडील विजय गायधने हे फटाका विक्रेते असून, तुमसरात त्यांचे दुकान आहे. त्यांना अनुराग आणि पुजा ही दोन अपत्ये आहेत. पुजा अनुरागची मोठी बहीण असून, तिने बीएस्सी केले आहे, तर अनुराग आयटीआय करीत होता. वैनगंगा नदीत उडी घेण्यापूर्वी अनुरागने बहीण पुजा हिच्या व्हॉट्सॲपवर ताई मला माफ कर, असा भावनिक संदेश पाठविला होता. सोमवारी त्याचा मृतदेह पाहून आई आणि पुजाचा आक्रोश आसमंत भेदून टाकणारा होता. गत आठ दिवसांपासून कुणाच्या पोटात अन्नाचा कण नव्हता. अनुराग जिवंत सापडेल, अशी आशा होती. मात्र, रविवारी मृतदेह पाहताच गायधने परिवारावर आकाश कोसळले.