लोकमत न्यूज नेटवर्क तुमसर : नगर परिषद हद्दीतील शहराची हद्दवाढ होण्याकरिता सन २०२१ पासून शासनाकडे प्रस्ताव पडून होता. अखेर हा प्रस्ताव मार्गी लागला आहे. आमदार राजू कारेमोरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हद्दवाढीचा मुद्दा पटवून देऊन तुमसरच्या विकासाचा मार्ग मोकळा केला आहे. या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी झाली असून, राज्यपालांच्या आदेशानुसार नगर विकास विभागाचे उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी शुक्रवारी शासन निर्णय काढला आहे.
नगर परिषद तुमसर ही 'ब' वर्ग नगर परिषद असून, तुमसरपैकी काही क्षेत्र नगर परिषद तुमसर हद्दीत समाविष्ट नव्हते. सध्या नगर परिषद चे क्षेत्रफळ ७.५६ चौ. कि. मी. असून, हद्दवाढीमुळे १४.४२ चौ. कि. मी. क्षेत्र विस्तार होईल. सदर प्रस्ताव सन २०२१ पासून प्रलंबित होता. आमदार राजू कारेमोरे यांनी दिलेल्या सूचनेनुसार मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता.
या हद्दवाढीमुळे नगर परिषद हद्दीजवळील विकसित झालेल्या भागातील अभिन्यास विकसित करण्यास, तसेच इतर पायाभूत सुविधा मिळण्याची संधी मिळणार आहे. शिवाय नागरी सुविधा विकसित करण्यासाठी हद्दवाढ योजनेअंतर्गत अनुदान उपलब्ध होईल.
५०० कोटींचा अतिरिक्त निधी मिळणार नगर विकास मंत्रालयाच्या धोरणानुसार, हद्दवाढीनंतर करावयाच्या विकासकामांसाठी ५०० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. यातून लगतच्या समाविष्ट क्षेत्रात रस्ता, नाल्या, ड्रेनेज यासह अन्य नागरी सुविधा उभारल्या जाणार आहेत.
"तुमसर शहराच्या हद्दवाढीला मंजुरी मिळाल्याने या तालुका मुख्यालयाच्या शहराच्या विकासाचे नवे दालन सुरू होणार आहे. ५०० कोटी रुपयांच्या विकासनिधीतून वळणमार्गासह अनेक नागरी सुविधा निर्माण होतील. यामुळे या शहराच्या औद्यागिक विकासाचा मार्ग प्रशस्त होईल." - राजू कारेमोरे, आमदार