कोंढा कोसरा (भंडारा) : आधुनिक काळात विवाह म्हणजे एकप्रकारे श्रीमंतीचे शक्तिप्रदर्शन होत आहे. लग्नाचा मोठा बडेजाव केला जातो. आलिशान वाहनातून वरात काढण्याचे प्रकार नवीन नाही. मात्र पवनीच्या एका शेतकरी पुत्राची वरात रविवारी चक्क बैलगाडीत वधू मंडपी पोहचली आणि वऱ्हाड्यासह गावकरीही आश्चर्यचकित झाले. बैलगाडीतून वरात काढत शेतीनिष्ठेची प्रचिती देणाऱ्या नवरदेवाचे नाव आहे राजेश लांजेवार.
अनेक ठिकाणी विवाह सोहळा विमान, हेलिकॉप्टर, जहाज, पर्वत अशा अनेक ठिकाणी पार पाडून श्रीमंतीचे प्रदर्शन केले जाते. पण, पवनी येथील विवाह जुन्या काळातील आठवण देऊन गेला. ३० वर्षांपूर्वी लग्नाची वरात बैलबंडीतून काढली जायची. आता आधुनिक युगात ही प्रथा बंद पडलेली आहे. मात्र पवनी येथील राजेश लांजेवार यांची वरात रविवारी बैलगाडीतून काढण्यात आली.
शेतकरी कुटुंबातील राजेशने वधूला स्वतःच्या शहरात आणून लग्न करण्याचा निश्चय केला. त्यासाठी भूमिपुत्राप्रमाणे बैलगाडीवर स्वार वाजत-गाजत वरात काढली. बैलगाडीसमोर लावलेले 'शेतकरी राजा' असा फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. यासाठी सोनू दंडारे, दत्तू भाजीपाले, देवेंद्र ऊकरे, भूषण लांजेवार बोलू लांजेवार अजून प्रवीण लांजेवार अजय लांजेवार दत्तू खंदाडे यांनी बैलबंडीची व्यवस्था केली होती.
जुन्या आठवणींना उजाळा
२० वर्षांपूर्वी लग्न सोहळ्याची वरात अशा पद्धतीने काढली जात होती. रविवारी त्या आठवणी ताज्या झाल्या. बैलबंडी आकर्षक पद्धतीने सजविण्यात आलेली होती. बैलांनासुद्धा साज चढविण्यात आला होता. बैलगाडी हाकलणारा व्यक्ती सारथीच्या रूपात विराजमान होता. त्याच्या मागे नवरदेव राजकुमारासारखा दिसत होता. संपूर्ण वरात बँडबाजाच्या गजरात गावाच्या मुख्य रस्त्यावरून भ्रमण करत आनंद व्यक्त करीत होती.