वरठी (भंडारा) :गुन्हेगारी प्रवृत्तीला कायद्याचा धाक उरला नसल्याचे पुन्हा एकदा शुक्रवारी स्पष्ट झाले. भरदिवसा खुलेआम एका ३० वर्षीय तरुण व्यावसायिकाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. राहुल उर्फ बंटी लालचंद जयस्वाल (रा. टाकळी) असे मृताचे नाव आहे. राहुल हा हार्डवेअर व रेती विकण्याचे काम करायचा. ही थरारक घटना शुक्रवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास भंडारा - वरठी राज्य महामार्गावर गणेशनगरीसमोर घडली.
फिल्मी स्टाईलने घडलेल्या या गुन्ह्याचा छडा पोलिसांनी त्यापेक्षा जास्त वेगाने लावला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीच्या आधारे मारेकऱ्यांचा शोध घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी राकेश तिरपुडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. कचरू चोपकर (रा. शुक्रवारी) व बग्गा गाते (रा. हलदरपुरी) यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी फरार असून, त्यांच्या शोधात पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. बातमी लिहीपर्यंत आरोपींना अटक व्हायची होती.
राहुल हा नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीने कोथुर्णा येथे गेला होता. काम आटोपून परत येत असताना दाभा पेट्रोल पंपासमोर त्याला काही लोकांनी हाक दिली. ते परिचित असल्याने तो थांबला. गप्पा सुरु असताना एकाने त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. डोळ्यात आग होताच राहुल दुचाकीवरून खाली कोसळला. मारेकऱ्यांनी नेमका हाच डाव साधला. राहुल खाली कोसळताच धारदार शस्त्राने सपासप वार करून त्याचा खून केला. तो मृत झाल्याची खातरजमा केल्यावर मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले.
महामार्गावर खून होण्याची एका आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. सकाळची वेळ असल्याने या मार्गावरून वाहतूक सुरू होती. खुनाच्या घटनेचा अनेकांनी लाईव्ह अनुभव घेतल्याचे कळते. भरदिवसा निर्धास्त होणाऱ्या खुनाच्या घटनांनी जिल्हा हादरला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निशांत मेश्राम घटनास्थळावर ताफ्यासह दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून नातेवाईकांकडून माहिती घेऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवल्याने अवघ्या काही तासात पोलिसांना मारेकऱ्यांचा शोध घेण्यात यश मिळाले.
सपासप केले २६ वार
आरोपी व मृतक यांची ओळख होती. आर्थिक देवण घेवाणीचे वाद असल्याने खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पण खुनामागे दुसरे कारण तर नाही ना, याचा शोध पोलीस घेत असून आरोपींना ताब्यात घेतल्यावर खुनाचे रहस्य उलगडणार आहे. राहुलच्या प्रतीक्षेत दबा धरून असलेल्या मारेकऱ्यांनी गोष्टीत रंगवून घटनेला अंजाम दिला. धारदार शस्त्राने तब्बल २६ वार करण्यात आले. खुनाचा कट नियोजीत होता. राहुलवर वार होत असताना काहीजण गाडी घेऊन बाजूला उभे होते, अशी माहिती आहे.