राजू बांते
मोहाडी (भंडारा) : येथील पंचायत समितीचे सभापती रितेश वासनिक यांची सभापतीपदाची खुर्ची अखेर वाचली. अविश्वास ठरावाच्या बाजूने ९ मते पडली. तर विरुद्ध बाजूने ३ मते पडली. ठराव पारित होण्यासाठी १० मतांची गरज होती. पण, ऐनवेळी बाजू पालटली अन् सभापतींविरुद्धचा अविश्वास ठराव बाळगला. ३३ वर्षांपूर्वी सभापती रामाजी गायधने यांच्याही विरोधात आणलेला अविश्वास ठराव नामंजूर झाला होता. त्यामुळे आज इतिहासाची पुनरावृत्ती झाली.
अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी दुपारी दोन वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. अर्धा तासांपूर्वीच पर्यटनाला गेलेल्या बाराही सदस्यांचा ताफा पंचायत समितीच्या सभागृहात पोहचला. त्यानंतर दोन वाजता आमदार राजू कारेमोरे पंचायत समितीच्या परिसरात दाखल झाले. तीन तास ते आपल्या वाहनातच ठाण मांडून होते.
अविश्वास ठरावादरम्यान सभागृहात वेगळेच चित्र दिसून आले. विशेष सभेसाठी सभागृहात भाजपासोबत गेलेले राष्ट्रवादी पक्षाचे पंचायत समिती सदस्य उमेश भोंगाडे व आशा बोंदरे हे दोघे सभागृहाबाहेर होते. तर सभापती रितेश वासनिक, बाणा सव्वालाखे व पर्यटनाला गेलेल्या राष्ट्रवादीच्या वंदना सोयाम हे तीघे एका बाजूला बसलेले होते. तर भाजपचे आठ पंचायत समिती सदस्य व एकट्या राष्ट्रवादीच्या प्रीती शेंडे हे नऊ जण एका बाजूला बसले होते. पण, ऐनवेळी बाजू पालटली अन् सभापतींविरुद्धचा अविश्वास ठराव बाळगला.
उत्सुकता पोहचली शिगेला
पंचायत समितीच्या चौफेर पोलिसांनी नाकाबंदी केली होती. पंचायत समितीच्या मुख्य दोन बाजूला राष्ट्रवादी पक्षाच्या व विरोधी गटातील कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांच्या उपस्थितीत पोलिस यंत्रणाही सज्ज होती. विशेष पोलिस दल सुद्धा दाखल झाले होते. वेळ जसजशी पुढे सरकत होती. तसतसे गर्दीतील फोन खणखणत होते. एकमेकांना ‘काय झालं’ अशी विचारणा करीत होते. अखेर राष्ट्रवादी पक्षाचे बाणा सव्वालाखे बाहेर आले. त्यांनी दुरूनच विजयी चिन्ह दाखविताच अजित पवार गटातील कार्यकर्त्यांनी घोषणा देत गुलाल उधळून घोषणाबाजी केली.