- हरिश्चंद्र कोरेभंडारा - अतिवृष्टी आणि किडींच्या आक्रमणाने धान पिकातून मजुरीही हाती येण्याची शक्यता नसल्याने हतबल झालेल्या एका शेतकऱ्याने चक्क चार एकरांतील उभा धान पेटवून दिला. ही घटना लाखांदूर तालुक्यातील इटान येथे बुधवारी घडली. खर्च एक लाख, उत्पादन एक छदामही येत नसल्याने धानाला आग लावून दिल्याने शेतकऱ्याने सांगितले.
दादाजी गणपत ठाकरे, रा कऱ्हांडला, ता. लाखांदूर असे उभे धान पेटविणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव आहे. त्यांची इटान शिवारात दोन एकर शेती आहे. त्यांच्या शेतातला लागून असलेली नागपूर येथील स्वानंद देशकर यांची चार एकर शेती बटईने केली. सुरुवातीला पऱ्हे पुराने गेले. दुबार पऱ्हे टाकून रोवणी केली. भरघोस उत्पादनासाठी मेहनत घेतली. रात्रंदिवस शेतात राबले. रासायनिक खते व कीटकनाशकांची मात्रा दिली. यासाठी सुमारे एक लाख रुपये खर्च झाला. धानाचे पीक जोमदार आले. भरघोस उत्पन्न मिळण्याची आशा होती. मात्र, धानचा निसवा झाल्यानंतर पेरवा आणि तुडतुड्याने आक्रमण केले.
चार एकर शेतीतून दहा किलोही धानही पदरात पडण्याची आशा नव्हती. कापणीसाठी मजुरी द्यायची कुठून? अशा विवंचनेत ते सापडले होते. अशातच ते बुधवारी आपल्या शेतात गेले. दुपारी ३ वाजताच्या सुमारास बटईने केलेल्या शेतातील धानाला आग लावून दिली. अवघ्या काही तासांत चार एकारांतील धान जळून नष्ट झाला. सायंकाळी हा प्रकार गावात माहीत झाल्यावर अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतशिवारात धाव घेतली.
खरीप हंगामात चांगले उत्पादन मिळविण्यासाठी मेहनत घेतली. शेतीत पैसा ओतला; पण दुर्दैवाने सर्व होत्याचे नव्हते झाले. नाइलाजाने उभे धान पेटविण्याचा निर्णय घ्यावा लागला. आता वर्षभर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा? शासनाने नुकसानभरपाई देऊन दिलासा द्यावा, अशी अपेक्षा आहे.- दादाजी गणपत ठाकरे, धान उत्पादक शेतकरी, कऱ्हांडला