अड्याळ : मालकीच्या जागेची मोजणी करून दुबारफेर दुरुस्तीकरिता मोजणी प्रक्रिया अवलंबविण्यात आली. यात चक्क कुटुंबीयांना फेर मोजणी व सुनावणीची तारीख ५४ वर्षांपूर्वीची देण्यात आली. दि. १ जानेवारी १९७० अशी ती तारीख असून, ऑनलाइन साइटवर आलेल्या पत्रामुळे कुटुंबीयांची धांदल उडाली आहे. हा प्रकार जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयामार्फत घडल्याचे सांगण्यात येत आहे.
अड्याळ येथील सुरेश मोरेश्वर श्रृंगारपवार हे गुजरी चौक येथील बुनियादी शाळेसमोर राहतात. त्यांनी आपल्या मालकीच्या जागेची मोजणी केली होती. याची दुबार फेर दुरुस्ती अंतर्गत त्यांनी मोजणी प्रक्रियेला अर्ज दाखल केला होता. यात कुटुंबातील चार सदस्यांनी पहिला अपील अर्ज दाखल केला. यात १६ फेब्रुवारी २०२४ नंतर अपील सुनावणीसाठी गेले होते. मात्र त्यावेळी जिल्हाध्यक्ष भूमिअभिलेख कार्यालयामार्फत माहिती न देता टाळाटाळ करण्यात आली. १२ ऑक्टोबरला चावडी महाभूमीच्या ऑनलाइन साइटवर हे सुनावणीचे पत्र दिसले.
ग्रामीण भागाचे काय? ग्रामीण पातळीवरही भूमिअभिलेख कार्यालयाचा कारभार रामभरोसे चालत असल्याचे अनेक प्रकार दिसून येतात. आता चक्क भंडारा जिल्ह्यात मुख्यालयी असलेल्या जिल्हा भूमिअभिलेख कार्यालय मार्फत आलेल्या ऑनलाइन पत्रातच तारखेचा घोळ आहे. चक्क मुख्यालयातील कार्यालयाकडून घडलेल्या या प्रकाराबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.