तुमसर (भंडारा) : घरात वाद झाल्याने रागाच्या भरात दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणी घरून निघून गेल्या. घरच्यांनी शोधाशोध केल्यानंतरही त्यांचा थांगपत्ता लागत नव्हता. अखेर पालकाने तुमसर पोलीस ठाणे गाठले. मुली घरून निघून गेल्याची माहिती दिली. पोलिसांनी गंभीरतेने घेत शोधासाठी एक पथक नेमले. पथकाने शोधमोहीम राबवून अवघ्या ११ तासांत दोन्ही बहिणींना शोधून काढले. नागपूर येथून त्यांना गुरुवारी पालकांच्या हवाली केले. पोलिसांच्या तत्परतेने दोन मुली सुखरूप घरी आल्या.
तालुक्यातील डोंगरला येथील दोन अल्पवयीन बहिणी मंगळवारी दुपारी घरी काही न सांगता निघून गेल्या. पालकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, थांगपत्ता लागत नव्हता. अखेर तुमसर ठाणे गाठून मुली घरून निघून गेल्याची माहिती दिली. दोन्ही मुली अल्पवयीन असून, एक १४ आणि दुसरी १५ वर्षांची आहे. आईने मुली हरवल्याची तक्रार दाखल केली. तुमसर पोलिसांनी गंभीरतेने घेत पोलिसांचे एक पथक नेमले. तुमसर शहराच्या आजूबाजूला शोध घेतला. मात्र, त्यांची माहिती मिळत नव्हती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे मुलींच्या मित्रांकडे वळविली. तेव्हा एका मित्राचे मोबाईल लोकेशन नागपूर येथे असल्याचे कळले. त्या लोकेशनवरून पोलिसांनी नागपूर गाठले. मुलींच्या संपर्कात असलेल्या मित्राला विचारपूस केली. सुरुवातीला त्याने टोलवाटोलवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी हिसका दाखवताच मुलींची माहिती दिली. पोलिसांनी त्याचे नागपूर येथील हजारी पहाड परिसरातील घर गाठत मुलींना ताब्यात घेतले. गुरुवारी मुलींना आईच्या ताब्यात देण्यात आले.
आईच्या बोलल्याचा मनात राग
गतवर्षी त्यांच्या वडिलांचा कोरोनाने मृत्यू झाला होता. अडीच एकर शेती असून, त्यावरच उदरनिर्वाह करतात. आईकडेच त्यांची सर्व जबाबदारी आहे. अभ्यासासाठी आई रागावल्याने आपण घरातून निघून गेल्याची कबुली या दोन्ही बहिणींनी पोलिसांपुढे दिली. तुमसर पोलिसांनी अवघ्या ११ तासांत त्यांना ताब्यात घेतले. ही कार्यवाही तुमसर ठाणेदार नितीन चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहायक निरीक्षक अमर धंदर, पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती गीते, पोलीस नायक मार्कंड डोरले, पोलीस हवालदार रोडगे यांनी केली.