भंडारा : वैनगंगा नदीत पवनी येथे पुलावरून उडी मारल्यानंतर बेपत्ता झालेल्या तरुणाचा पाच दिवसांनंतर मृतदेहच आढळला. पवनी तालुक्यातील चिचाळ येथील हा तरुण असून त्याचा मृतदेह चंद्रपूर जिल्ह्यातील हळंबा येथे शुक्रवारी आढळून आला.
अजवीन दिलीप काटेखाये (१८) असे मृताचे नाव आहे. त्याने २८ ऑगस्ट राेजी गाेसे धरणाच्या मागील बाजूस असलेल्या पुलावरून वैनगंगा नदीत उडी मारली हाेती. याप्रकाराची माहिती हाेताच अड्याळ, पवनी पाेलीस आणि बचाव पथकांनी शाेध माेहीम राबविली. चार दिवसांनंतरही त्याचा थांगपत्ता लागत नव्हता. दरम्यान, शुक्रवारी सकाळी चंद्रपूर जिल्ह्यातील सावली पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील हळंबा येथे त्याचा मृतदेहच मिळाला. त्याचा मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.
अजवीनने पुलावरून उडी मारली ताे प्रकार गाेसे येथील गुराखी मंगेश बागडे यांनी बघितला हाेता. त्यानेच ही महिती पाेलिसांना दिली. मात्र, त्याने वैनगंगेत उडी का घेतली याचा शाेध पाेलीस अजवीनच्या मित्राकडून घेत हाेते. अजवीन हा वैनगंगेच्या तिरावर आपल्या एका मित्रासाेबत दुचाकीने आला हाेता. मित्र निघून गेल्यानंतर त्याने वैनगंगेत उडी घेतली. पाच दिवसांच्या शाेध माेहिमेनंतर मृतदेहच आढळला. तपास उपविभागीय पाेलीस अधिकारी रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात पाेलीस निरीक्षक सुधीर बाेरकुटे, पवनीचे ठाणेदार दिलीप गढरी, पाेलीस उपनिरीक्षक हेमराज साेरते करीत आहेत. या घटनेने हळहळ व्यक्त हाेत आहे.
सखाेल चाैकशीची मागणी
अजवीनला ऑनलाईन रमी खेळण्याचा नाद असल्याची चर्चा असून यातच त्याने आपली दुचाकी दहा हजार रुपयात अड्याळ येथे गहाण ठेवली हाेती. तसेच उधारी मागणारेही त्याच्या घरी येत असल्याने ताे त्रस्त असल्याची माहिती आहे. मात्र, नेमक्या काेणत्या कारणाने आत्महत्या केली हे कळू शकले नाही. त्याच्या मृत्यूसंदर्भात त्याच्या मित्राची सखाेल चाैकशी करावी अशी मागणी गावकरी करीत आहे.