लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आधारभूत किंमत धान खरेदी याेजनेंतर्गत खरीप हंगामातील धान खरेदीचे भंडारा जिल्ह्याला ४१ लाख ८८ हजार ४६७ क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ४६ केंद्रांना सध्यस्थितीत १० लाख ६४१ क्विंटल धान खरेदीची परवानगी देण्यात आली असून, प्रत्यक्षात मात्र धान खरेदी सुरु झाली नाही. मात्र शनिवारपासून काही केंद्रावर धान खरेदी सुरू होणार असल्याची माहिती आहे. तर नवीन १३७ केंद्रांचा प्रस्ताव करण्यात आला आहे.दिवाळी संपली तरी जिल्ह्यात धान खरेदी सुरु झाली नव्हती. त्यामुळे शेतकरी धान खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्र स्टेट काे-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनने २ नाेव्हेंबर राेजी एका आदेशाने जिल्ह्यात धान खरेदी केंद्र सुरु करण्याचे निर्देश दिले आहे. शनिवारपासून ४५ केंद्रांवर धान खरेदी सुरु हाेईल, असे सांगण्यात आले आहे.आधारभूत किंमत धान खरेदी याेजनेंतर्गत खरीप हंगाम २०२२-२३ साठी जिल्ह्याला ४१ लाख ८८ हजार ४६७ क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. उद्दिष्ट केंद्रनिहाय तयार करुन पाेर्टलवर लाॅक करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. सध्या स्थितीत भंडारा जिल्ह्यात ४६ केंद्रांना धान खरेदीची परवानगी देण्यात आली आहे. दहा लाख ६४१ क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट त्यांना देण्यात आले आहे. गतवर्षी २०७ केंद्रांवर धान खरेदी करण्यात आली हाेती. यंदा सुरुवातीला केवळ ४६ केंद्रांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र नवीन १३७ केंद्रांचे प्रस्ताव सादर करण्यात आले असून, त्यांनाही लवकरच मान्यता मिळणार आहे.
ही आहेत ४६ धान खरेदी केंद्रे भंडारा तालुक्यातील कारधा, धारगाव, वाकेश्वर, पहेला, माेहाडी तालुक्यांतील माेहाडी, माेहगावदेवी, तुमसर तालुक्यातील हरदाेली सिहाेरा, सिहाेरा, मांगली (तुमसर), तामसवाडी, माेहाडी खापा, हरदाेली आंबागड, लाखनी तालुक्यातील सालेभाटा, जेवनाळा, पिंपळगाव, लाखाेरी, लाखनी, मुरमाडी तूपकर, साकाेली तालुक्यातील सानगडी, साकाेली, विरसी, वडेगाव, निलज, धर्मापुरी, लवारी, लाखांदूर तालुक्यातील भागडी, लाखांदूर मासळ, किन्हाळा, आसाेला, कऱ्हांडला, पुयार, इटान, कुडेगाव, किरमाटी, मांदेड, राजणी, बाेथली आणि पवनी तालुक्यातील वाही, काेदुर्ली, चिचाळ, पवनी, आसगाव, अड्याळ, वलनी, सेंद्री बुज या केंद्राचा समावेश आहे.
५२ हजार शेतकऱ्यांची ऑनलाइन नाेंदणी- धान खरेदीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नाेंदणी करावी लागते. आतापर्यंत जिल्ह्यातील ५२ हजार ७७५ शेतकऱ्यांनी नाेंदणी केली आहे. जिल्ह्यात नाेंदणीकृत शेतकऱ्यांची संख्या दाेन लाख २३ हजार १०१ आहे. ऑनलाइन नाेंदणीच्या अडचणीमुळे अद्यापही नाेंदणीची अंतिम मुदत १० नाेव्हेंबर आहे. नाेंदणीसाठी ॲप विकसित करण्यात आले आहे.