भंडारा : तुमसर तालुक्यातील माडगी येथील वैनगंगा नदीच्या १०० वर्ष जुन्या ब्रिटिशकालीन रेल्वे पुलावर तरुण घेत असलेली सेल्फी व फोटोग्राफी जीवघेणी ठरू पाहत आहे. या पुलावर फोटोग्राफीचे उत्तम लोकेशन असल्याचे तरुण सांगतात. मात्र सेल्फी मोठ्या अपघातास कारणीभूत ठरू शकते. दरराेज हौशी तरुण येथे सेल्फीसाठी जीव धोक्यात घालत असल्याचे दिसत असून रेल्वे प्रशासनाने याला प्रतिबंध घालण्याची गरज आहे.
मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरील तुमसर रोड रेल्वे स्टेशनपासून अवघ्या आठ किमी अंतरावर माडगी येथे वैनगंगा नदीवर रेल्वे पूल आहे. पूर्व विदर्भाची मिनी पंढरी म्हणून ओळख असलेले भगवान नृसिंहाचे पावनस्थळ सुमारे १०० मीटर अंतरावर आहे. येथे पूर्व विदर्भासोबत छत्तीसगढ व मध्यप्रदेशातील भाविक येत असतात. अंत्यसंस्कार, पिंडदान आदी धार्मिक कार्य येथे पार पडतात. वैनगंगा नदीच्या विशाल पात्राचे विहंगम दृश्य अनेकांना मोहित करते. त्यामुळेच हौशी तरुण महागडे कॅमेरे व मोबाइलच्या साहाय्याने फोटोग्राफीचा आनंद लुटताना दिसतात. तरुण अक्षरशः रुळांवर बसून, उभे राहून फोटो व सेल्फी काढताना दिसून येतात. यामुळे तरुणांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नदीपात्रात नृसिंह यात्रा पार पडली. हजारो भक्तांनी पर्यटनाचा व देवदर्शनाचा लाभ घेतला. तरुण व तरुणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आले होते. किंबहुना आता ही येणे सुरूच आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने इथे प्रचंड गर्दी झाली होती. काही तरुण थेट रेल्वे पुलावर चढून फोटोशूट करताना दिसले. फोटोशूट सुरू असताना अचानक रेल्वे आली, तर होणाऱ्या अपघाताला जबाबदार कोण? असा प्रश्न आहे.
पुलावर रेल्वे गार्डची आवश्यकता
नागपूर ते बिलासपूर दरम्यान नव्यानेच वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाली. या गाडीचा वेग ताशी १२० किलोमीटर असतो. एवढ्या वेगात दुर्दैवाने पुलावर कोणतीही अनुचित घटना नाकारता येत नाही. या रेल्वे पुलावर रेल्वेचे अधिकृत गार्ड का नसतात? असा सवाल स्थानिक विचारत आहेत.