चंदन मोटघरे
भंडारा : रात्री कुणी तरी दरवाजा ठोठावतो. दार उघडले की पळून जातो. पाठलाग केला की काही अंतरावर अदृश्य होतो. असे गावकरी सांगतात. मात्र कुणाजवळ सबळ पुरावा नाही. पंधरा दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. तरुण रात्रभर हातात लाठ्याकाठ्या घेऊन गस्त घालतात, मात्र उलगडा हाेत नाही. लाखनी तालुक्याच्या पोहरामध्ये हे नवीनच काय? रात्रीस खेळ चाले या प्रकाराने गावात मात्र दहशत आहे.
पोहरात दररोज रात्री विचित्र घटना घडत आहे. गावकरी भीतीच्या वातावरणात आहेत. 'सावरखेड एक गाव' या मराठी चित्रपटाच्या कथानकाशी जुळणारी घटना गावकारी अनुभवत आहेत. यामागे अनोळखी लोक आहेत की अन्य कुणी? अशी संभ्रमावस्था आहे. या मागचा हेतू काय, हे समजण्यापलीकडे आहे. कुणी म्हणतात हा भुताटकीचा तर कुणी नानाविध शंका घेतात. प्रकार कोणताही असला तरी या मागचा मास्टरमाईंड व्यक्ती कोण? याचा उलगडा व्हावा अशी अपेक्षा आहे.
ग्राम सुरक्षा दलाकडून रात्र गस्त
या घटनांची सुरुवात होताच ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली. गावावर आलेलं संकट दूर व्हावे यासाठी गावातील दीडशे ते दोनशे तरुण युवक यात सहभागी झाले. रात्र जागून काढत गावाला पहारा देतात.
अज्ञात व्यक्ती दहशत पसरवत आहे. महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बाहेर निघणे काठीण झाले आहे. पोलिसांना कळविले आहे. प्रशासनाच्या मदतीने नेमके आहे काय याचा नक्कीच शोध घेवू.
- विद्या कुंभरे, जिल्हा परिषद सदस्य, पोहरा.
मी अंगणात उभी होती. झाडावरून काही पडल्याचे दिसले. मी बघायला गेले. त्या ठिकाणी एक व्यक्ती दिसला. तो लाल टी शर्ट व बरमुडा घातलेला होता. त्याचा जवळ मोबाइल टॉर्च खिशात दिसला. मी चोर म्हणून आरडले. काही तरुण व महिला आल्या. त्यांनाही तो दिसला. मात्र, काही क्षणात त्याने पळ काढला. तो चोर होता की कोण सांगता येणार नाही.
-स्मिता मेश्राम, प्रत्यक्षदर्शी महिला, पोहरा.
‘माहिती मिळताच या ठिकाणी येऊन चौकशी केली. हा प्रकार भूत, भानामती, करणी नसून कुणी तरी मानसिक विकृती असणारा व्यक्ती हे घडवून आणत आहे. अंधश्रध्दा बाळगू नये. सर्वांच्या मदतीने त्याला पोलिसांच्या स्वाधीन करू’
- विष्णुदास लोणारे, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, भंडारा.