विशाल रणदिवे
अड्याळ (भंडारा) : पवनी तालुक्यातील अड्याळजवळील विरली खंदार गावालगत असलेली ऐतिहासिक बाहुली विहीर आज शेवटच्या मार्गावर आली आहे. तिची आजपावेतो शासन वा प्रशासनाने दखल घेतली नाही. तब्बल अडीचशे ते तीनशे वर्षांचा ऐतिहासिक वारसा नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या पिढीलाही ऐतिहासिक बाहुली विहीर म्हणजे काय व कशी असते हे कळणारसुद्धा नाही!
आजपर्यंत ही ऐतिहासिक बाहुली विहीर प्रकाशझोतात न येण्याची कारणे काहीही असली तरी मागील महिन्यात झालेल्या शिवजयंतीनिमित्त या विहीर व परिसराची साफसफाई येथील युवा ग्रामस्थांनी केली. आजपर्यंत ही ऐतिहासिक विहीर झाडाझुडपांमध्ये असल्याने कुणाच्याही लक्षात येत नव्हती; पण आज सर्व काही उघड झाल्याने हा ऐतिहासिक वारसा टिकून राहावा, यासाठी मात्र येथील ग्रामस्थ धडपड करीत आहेत. यासाठी आता तात्काळ शासनाने मदतीसाठी पुढे येणे गरजेचे झाले आहे.
बाहुली विहिरीवर त्याकाळी रघुजी राजे भोसले तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी भेट दिल्याचे येथील ज्येष्ठ वयोवृद्ध ग्रामस्थ सांगतात. त्या काळात विशेषतः बैलबंडीचा मार्ग असल्याने याठिकाणी नेहमीच वाटसरू मुक्काम ठोकत असत. अनेक प्रवासी व ग्रामस्थ याठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी येत असत. पाणीटंचाईच्या काळात या विहिरीमुळे परिसरातील अनेक गावांतील ग्रामस्थ या विहिरीच्या पाण्यासाठी येत होते; परंतु जसजसा काळ बदलला, तसतसे या विहिरीकडे सर्वांचे दुर्लक्ष होत गेले.
या ऐतिहासिक बाहुली विहिरीविषयी अधिक माहिती गोळा करत असताना येथील त्याकाळी आत्माराम नागोराव ब्राह्मणकर पाटील विरली खंदार यांच्या वाड्यात रघुजी राजे भोसले यायचे, तसेच त्या काळात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना १९४४ ते ६६ या काळात ग्रामस्थांनी दोनदा प्रबोधनसाठी आणले होते. त्या काळात बलदेव बाबा परिसर ग्राउंडमध्ये दोनदा मोठी सभा झाली होती. तेव्हा ते दृश्य अकल्पनीय असल्याचे आजही सांगितले जाते.
जर्जर झालेल्या ऐतिहासिक बाहुली विहिरीचा जीर्णोद्धार झाला पाहिजे. यासाठी शासनाने तात्काळ मदत करावी; अन्यथा ऐतिहासिक वारसा नष्ठ झाल्याशिवाय राहणार नाही.
- तुकाराम ब्राह्मणकर, वयोवृद्ध नागरिक, विरली खंदार