लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा वनविभागाची शान आणि रुबाबदार रुद्रा बी-२ या वाघाचा बळी शिकाऱ्यांनी लावलेल्या वीजतारांनीच घेतल्याचे उघडकीस आले आहे. शवविच्छेदन अहवाल आणि अटकेतील आरोपीने दिलेल्या कबुलीवरून या घटनेची सत्यता पुढे आली. भंडारा तालुक्यातील पलाडी गावाजवळ शुक्रवारी वाघाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. अवघ्या २४ तासांत वनविभागाने या प्रकरणाचा छडा लावला.जिल्ह्यात विपुल वनसंपदा असून नवेगाव-नागझिरा, कोका आणि उमरेड-कऱ्हांडला-पवनी ही तीन अभयारण्ये आहेत. या अभयारण्यांत मोठ्या प्रमाणात हिंस्र जीव आहेत. शुक्रवारी पलाडीजवळ मृत्युमुखी पडलेल्या रुद्रा वाघाचाही भंडारा वनक्षेत्रातील परिसरात मुक्त संचार होता. गराडा, मालीपार भागांत तो त्याच्या जोडीदार मादीसोबत फिरायचा. अनेकदा या देखण्या वाघाचे दर्शनही झाले होते. मात्र शुक्रवारी शिकाऱ्यांनी वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी लावलेल्या वीजप्रवाहित तारांमध्ये रुद्रा अडकला आणि जागीच मृत्युमुखी पडला.या घटनेने वनविभागच नव्हे तर वन्यजीवप्रेमीही हळहळले होते. वनविभागाने मिशन मोडवर या प्रकरणाचा तपास जारी केला. या वाघाचा मृत्यू शिकाऱ्यांनी लावलेल्या जाळ्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाल्याने वनविभागाने त्या दृष्टीने शोध जारी केला. अवघ्या २४ तासांत या प्रकरणाचा छडा लावून चांदोरी-मालीपार येथील दिलीप नारायण नारनवरे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याने वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी लावलेल्या तारांमुळे वाघाचा मृत्यू झाल्याची कबुली वनविभागापुढे दिली. वनविभागाने त्याला अटक केली. त्याच्यासोबत तीन साथीदार असल्याची माहितीही वनविभागाला मिळाली असून त्यांचा शोध वनअधिकारी घेत आहेत.दरम्यान, गडेगाव येथील प्रकाष्ट निष्कासन आगारात शनिवारी सकाळी रुद्रा बी-२ वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले. पशुसंवर्धनचे साहाय्यक आयुक्त अन्नुविजय वराडकर यांनी आपल्या चमूच्या साहाय्याने शवविच्छेदन केले. त्यावेळी या वाघाचा मृत्यू वीजप्रवाहाच्या धक्क्याने झाल्याचे स्पष्ट झाले.या प्रकरणाचा तपास साहाय्यक वन्यजीव संरक्षक वाय. बी. नागुलवार यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे. व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे प्रतिनिधी शाहीद खान, मानद वन्यजीव रक्षक नदीम खान यांनी वाघाच्या मृत्यूप्रकरणाचा छडा लावण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.
रुद्राचे सर्व अवयव शाबूत- शिकाऱ्यांचा उद्देश वाघाची शिकार करण्याचा नसल्याचे रुद्र बी-२ या वाघाचे सर्व अवयव शाबूत असल्यावरून स्पष्ट झाले आहे. मात्र या शिकाऱ्यांनी रानडुक्कर अथवा हरीण या वन्यजीवांची शिकार करण्यासाठी वीज तारांचा फास लावला होता आणि त्यात रुद्रा अडकला. पांदण रस्त्यावर मृतावस्थेत पडून असलेल्या रुद्राच्या नाकातून रक्तप्रवाह सुरू होता. तसेच त्याच्या एका पायाच्या बाजूने जळाल्याच्या खुणाही दिसून आल्या होत्या.
वरिष्ठ अधिकारी दाखल- रुद्रा वाघाच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी तळ ठोकून आहेत. प्रधान मुख्य वनसंरक्षक पी. कल्याणकुमार, विभागीय वनअधिकारी (दक्षता) प्रीतमसिंह कोडापे, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक पूनम पाटे, उपवनसंरक्षक शिवराम भलावी, वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक राजूरकर, प्रकाष्ट निष्कासन अधिकारी साकेत शेंडे यांचा समावेश आहे.
शिकाऱ्यांची वाढली हिंमत; वन्यप्राणी धोक्यात
वन्यप्राण्यांच्या मांसाला मोठी मागणी आणि अधिक पैसे मिळतात. त्यामुळे जंगलालगत असलेल्या गावातील अनेक जण शिकारीच्या मागे लागले आहेत. वीज तारांच्या मदतीने शिकार करण्याचे अनेक प्रकार यापूर्वीही उघडकीस आले आहेत. चांदोरी येथील अटक केलेल्या दिलीप नारनवरे या शिकाऱ्याजवळून शिकारीचे साहित्य जप्त करण्यात आले. मोठ्या प्रमाणात तार आणि लाकडी खुंट्या आढळून आल्या. यावरून त्यांची टोळी गत अनेक वर्षांपासून वन्यप्राण्यांची शिकार करीत असावी, असा संशय आहे. विशेष म्हणजे गत आठवड्यातही याच शिकाऱ्यांनी हरणाची शिकार केल्याची माहिती आहे. वनविभागाच्या स्थानिक कर्मचाऱ्यांना या सर्व प्रकाराची माहिती असते. परंतु थोड्या आमिषाला आणि चवीला भुलून ते वेळीच या शिकाऱ्यांना आवर घालत नाहीत. मात्र मोठे प्रकरण घडले की सर्व खडबडून जागे होता.