तुमसर (भंडारा) : पणन महासंघातर्फे आधारभूत किमतीत धान खरेदी केली जाते, मात्र नोव्हेंबर महिन्याच्या पहिला आठवडा उलटला तरी शासकीय यंत्रणेच्या अनास्थेमुळे जिल्ह्यात एकही धान खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत आहे. तुमसर व मोहाडी तालुक्यात केवळ चार शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. तत्काळ धान खरेदी केंद्र सुरू न केल्यास जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे १२ नोव्हेंबर रोजी भंडारा येथे मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यात येतील, असा इशारा आमदार राजू कारेमोरे यांनी दिला.
तुमसर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार कारेमोरे म्हणाले, एकीकडे शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटांना मेटाकुटीस आला आहे. खरीप हंगामात परतीच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे धान पीक पाण्यात वाहून गेले. जिवाचा आटापीटा करून कसेबसे धान पीक शेतकऱ्यांनी वाचविले. जिल्ह्यात २१ शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. मात्र त्यापैकी अनेक ठिकाणी अजूनपर्यंत धान खरेदी केंद्र सुरू झालेले नाही.
ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पाऊस झाला. अनेक ठिकाणी धान सडले. त्यामुळे धान हा काळा व पाखर झाला आहे. पाखर धान शासनाने खरेदी करावा. धानाला एक हजार रुपये बोनस द्यावा, अशी मागणीही आ. कारेमोरे यांनी केली आहे. यावेळी संसद रत्न खा. सुप्रिया सुळे यांना उद्देशून राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या अपमानजनक टिपणीविरोधात आ. कारेमोरे यांनी तीव्र निषेध व्यक्त केला.
५०० ते ६०० हेक्टर शेतीकरिता एक शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र शासनाने निश्चित करावे. त्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ धानाचा मोबदलाही मिळण्यास मदत होईल. शेतकरी खासगी व्यापाऱ्यांकडे धान विकण्यास बाध्य होत असून, त्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचेही आमदार कारेमोरे यांनी सांगितले. यावेळी माजी खासदार मधुकर कुकडे, तालुकाध्यक्ष देवचंद ठाकरे, रायुका अध्यक्ष ठाकचंद मुंगूसमारे, मोहाडी पंचायत समिती सभापती रितेश वासनिक, योगेश सिंगनजुडे, प्रदीप भरणेकर, पमा ठाकूरसह पदाधिकारी उपस्थित होते.