मोहन भोयरलाेकमत न्यूज नेटवर्कतुमसर : महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमेवरून वाहणाऱ्या नदीपात्राच्या खोऱ्यात दोन्ही राज्यातील शेतकरी मागील २०० वर्षांपासून ऊस लागवड करीत आहेत. ऊस विक्री करणे व मोबदला बराच वेळ लागत असल्याने त्यातून मार्ग काढण्याकरिता दोन्ही राज्यातील शेतकऱ्यांनी गूळ निर्मितीतून शासकीय मदतीविना आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू केली आहे. तुमसर तालुक्यातील शेवटच्या टोकावरील गावात व मध्य प्रदेशातील सीमावर्ती गावात अशी गूळ निर्मिती उद्योगांची संख्या (गुऱ्हाळ) सुमारे १०० पेक्षा अधिक आहे.तुमसर तालुक्यातील देवनारा, चांद मारा, लोभी, आष्टी, पाथरी, धुटे रा, कवलेवाडा, घानोड, सक्करधरा, सोंड्या टोला इत्यादी गावे नदीकाठावर असून मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील गोरे घाट, बड पाणी, महके पार, अंजनविहिरी, दिगघा, बाम्हणी, पुलप्पू ट्टा, हरदोली, छ तेरा, टेकाडी इत्यादी गावे आहेत. या गावात ऊसाची शेती मागील दोनशे वर्षांपासून करणे सुरू आहे. गावातील कोहळी समाज बांधवांची या परिसरात मोठी संख्या आहे. ऊसशेती लागवड करण्यात त्यांचा हातखंडा आहे. शेतकरी ऊसाची लागवड करीत असल्यामुळे त्यांना ऊसाचे भरघोस उत्पादन होते. परंतु हा ऊस विक्री करण्यास त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच ऊस विक्री केल्यानंतर त्याचा मोबदला मिळण्यास बराच विलंब होतो. येथील शेतकऱ्यांनी ऊस उद्योग निर्माण करण्यावर भर देऊन गूळ उद्योगाची निर्मिती केली. आष्टीचे माजी सरपंच व शेतकरी डॉ. अमृत सोनवणे यांनी सांगितले की बावनथडी नदीखोऱ्यात महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील शेतकरी मागील २०० ते २५९ वर्षांपासून ऊसाची शेती करीत असून येथे मोठ्या प्रमाणात गूळ निर्मिती करण्यात येते. ७० वर्षांपूर्वी या परिसरात विद्युतीकरण झाले नव्हते. तेव्हा ऊसाचा रस काढण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या क्रशरला बैल उपयोगात आणले जात होते. त्यानंतर डिझेल आणि क्रूड ऑइलच्या मदतीने क्रशरचा उपयोग करण्यात येऊन ऊसापासून रस काढण्यात येत होता.
शासनाकडून मदत नाही- येथील शेतकऱ्यांनी गूळ उद्योग निर्मिती केली. शेकडो महिला व पुरुषांना रोजगार मिळत आहे. परंतु शासनाकडून त्यांना अद्याप कोणतीच मदत मिळत नाही. ऊस गाळप हंगाम डिसेंबर ते मार्च महिन्यापर्यंत सुरू राहते. दोन्ही राज्याच्या सीमावर्ती भागात गूळ निर्मिती केंद्राची संख्या १०० पेक्षा अधिक आहे हे विशेष.