मोहाडी (भंडारा) : येथील पंचायत समिती सभापतीविरुद्ध आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी १८ रोजी विशेष सभा बोलावण्यात आली आहे. गटनेते असलेले व ज्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला आहे ते सभापती रितेश वासनिक यांनी अखेर भात्यातील शेवटचे वैधानिक ‘व्हिप’चे अस्त्र बाहेर काढले आहे, तर राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रभारी जिल्हाध्यक्ष किरण अतकरी यांनी गटाला व्हिप बजावण्याचा अधिकार नसल्याने तो निष्प्रभ ठरविला जावा, अशी मागणी करणारे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. यामुळे या विशेष बैठकीत कोणाचे अस्त्र चालणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
सभापती रितेश वासनिक यांनी गटनेता या नात्याने गुरुवारी व्हिप काढला. तो स्वीकारायला कुणी सदस्य गावात नसल्याने राष्ट्रवादी पक्षाच्या पंचायत समिती सदस्यांच्या घरी जाऊन त्यांनी स्वत: भिंतीवर चिकटवला. तो सदस्यांकडून किती गंभीरपणे घेतला जातो, हे आता महत्त्वाचे आहे. आयुधातील शेवटचा उपाय म्हणून व्हिप वापरला जाणार, याबाबत ‘लोकमत’ने १७ ऑगस्टला वृृत्त दिले होते. ते खरे ठरले आहे.
मोहाडी पंचायत समितीत राष्ट्रवादी पक्षाचे सहा सदस्य निवडून आले. संख्याबळ कमी असतानाही राष्ट्रवादी पक्षाचे सभापती बनले. कारण आरक्षणाने राष्ट्रवादी पक्षाला साथ दिली. भाजपाचे ८ सदस्य निवडून आले होते. मात्र, त्यांच्याकडे एकही अनुसूचित जातीमधील एकही सदस्य नव्हता. त्यामुळे आयती संधी राष्ट्रवादी पक्षाकडे चालून आली. याची सल भाजपाच्या सदस्यांना व त्यांच्या नेत्यांना सुद्धा होती. राष्ट्रवादी पक्षाच्या चार सदस्यांना आपल्या जाळ्यात भाजपाने फसवून वासनिक यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल केला.
काय आहे व्हिपमध्ये...
सभापतीवरील अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी १८ ऑगस्टला बोलाविलेल्या विशेष सभेत अविश्वास ठरावाविरुद्ध राष्ट्रवादी पक्षाच्या सदस्यांनी मतदान करावे. दिलेल्या व्हिपचे उल्लंघन केल्यास आपले पंचायत समिती सदस्य रद्दसाठी पात्र असाल, असा यात उल्लेख आहे.
गटाला व्हिपचा अधिकार नाही : किरण अतकरी
दरम्यान, प्रभारी जिल्हाध्यक्ष किरण अतकरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे गुरुवारी दुपारी एक पत्र सादर करून, निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्राप्रमाणे मूळ पक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वातील असून सर्व अधिकार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे आहेत. गटाला व्हिप बजावण्याचा कायदेशीर आधिकार नाही. पक्षाकडून कोणताही व्हिप काढलेला नाही. कुणी काढला असल्यास तो मूळ राष्ट्रवादी पक्षाचा नाही, असे म्हटले आहे.