गोपालकृष्ण मांडवकर
भंडारा -राष्ट्रीय महामार्गालगत खरबी (नाका) स्मशान भूमीमध्ये शुक्रवारी अर्धनग्न स्थितीत पोत्यात बांधलेल्या मृत महिलेची अद्यापही ओळख पटलेली नाही. यामुळे तिचा खून करून येथील स्मशानभूमीत प्रेत आणण्यामागील रहस्यही कायमच आहे.
खरबी (नाका) गावातील स्मशान भूमीमध्ये शेड खाली पांढऱ्या पॉलिथिन पिशवीत अर्ध नग्न अवस्थेत हे प्रेत आढळले होते. शुक्रवारी सायंकाळी नागपूर थेथील मेडिकल कॉलेजमध्ये प्रेताचे शवविच्छदन करण्यात आले असून व्हिसेरा तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे.
या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांचे शोधकार्य सुरू आहे. या संदर्भात अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे यांच्याकडे विचारणा केली असता, महामार्गावरील टोलनाक्यांच्या सीसीसटिव्हीचे फुटेज तपासणे सुरू केले असून सर्व जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांमध्ये या महिलेची छायाचित्रे पाठविली असल्याचे सांगितले. घटनास्थळी आढळलेल्या पुराव्यांच्या दिशेनेही तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.