लाेकमत न्यूज नेटवर्कसाकाेली : दर्जा, पाणी व्यवस्थापन आणि पर्यावरणाचा विचार करून साकाेली व लाखनी येथे देशातील सर्वाेत्कृष्ट उड्डाणपूल बांधले आहे. स्टेट ऑफ आर्ट म्हणून या पुलाची दखल घेतली जाईल. विदर्भाचा सर्वांगीण विकास हेच माझे स्वप्न आहे, असे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.साकाेली व लाखनी येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या लाेकार्पण साेहळ्यात ते बाेलत हाेते. कार्यक्रमाला खासदार सुनील मेंढे, जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधरराव जिभकाटे, आमदार डाॅ. परिणय फुके, जिल्हाधिकारी संदीप कदम, भाजप जिल्हाध्यक्ष शिवराम गिरीपुंजे, तारीक कुरैशी, माजी खासदार शिशुपाल पटले, माजी मंत्री राजकुमार बडाेले, साकाेलीचे माजी आमदार बाळा काशिवार, डाॅ. हेमकृष्ण कापगते, रेखा भाजीपाले, नेपाल रंगारी, माहेश्वरी नेवारे, वनिता डाेये आदी उपस्थित हाेते.नितीन गडकरी म्हणाले, येथे पिकणाऱ्या धानाच्या तणसापासून इथेलाॅन तयार केले जाणार आहे. त्यामुळे तरुणांना राेजगार उपलब्ध हाेईल. या भागात पर्यटनाची उत्तम संधी आहे. आंभाेरा व नागझिरा या क्षेत्रात पर्यटनाच्या दृष्टिकाेनातून चांगले प्रकल्प हाती घेतले आहेत. देव्हाडा साखर कारखान्याची गाळप क्षमता दाेन हजारांहून पाच हजार केली आहे. त्यामुळे धान व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील, असे त्यांनी सांगितले.गडकरी यांनी सुरुवातीला उड्डाणपुलाचे निरीक्षण करून फीत कापून लाेकार्पण केले. त्यानंतर हाेमगार्ड परेड ग्राऊंडवर डिजिटल पद्धतीने लाेकार्पण केले. प्रास्ताविक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे राजू अग्रवाल यांनी केले. यावेळी खासदार सुनील मेंढे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमात उड्डाणपुलाच्या बांधकामात याेगदान देणाऱ्या चमूंचा सत्कार केला.
उड्डाणपुलाला शामरावबापू कापगते यांचे नाव- साकाेली येथील उडाणपुलाला दिवंगत शामरावबापू कापगते यांचे नाव देण्यात यावे, अशी सातत्याने मागणी हाेत हाेती. बापूंचे कार्य पाहता ती मागणी याेग्यच हाेती. त्यांनी समाजासाठी प्रामाणिकपणे कार्य करून समाज घडविला. यापुढे साकाेली उड्डाणपूल शामरावबापू कापगते उड्डाणपूल या नावाने ओळखला जाईल, अशी घाेषणा ना. गडकरी यांनी केली.सहाशे काेटी गुंतवणुकीचा इथेनाॅल प्रकल्प- जिल्ह्यात साखर कारखान्यात ६०० काेटी रुपयांची नवीन गुंतवणूक करून इथेनाॅल निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याची घाेषणा ना. गडकरी यांनी केली. पायाभूत सुविधांचा माध्यमातून जिल्ह्याचा विकास करणार, असे त्यांनी सांगितले.