भंडारा: शेतातून धान पेरणी करून गावी परतताना कालव्यात उलटलेल्या ट्रॅक्टरने अचानक पेट घेतल्यामुळे दोघांसह ट्रॅक्टरचाही जळून कोळसा झाला. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडली. ही दुर्दैवी घटना तुमसर तालुक्यातील आसलपाणी येथे मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.
ट्रॅक्टरमालक दिनेश मदन गौपाले (२७, रा. आसलपाणी) आणि ट्रॅक्टरचालक अर्जुन रामभजन राहांगडाले (३२, रा. भाेंडकी) अशी होरपळून मृत पावलेल्यांची नावे आहेत. दिनेश गौपाले यांच्या शेतात धानाची खार पेरणी आटोपून दुपारी दोघेही ट्रॅक्टरने गावाकडे निघाले. बघेडा कालव्याच्या रस्त्यावर रमेश गौपाले यांच्या शेताजवळील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर थेट कालव्यात जाऊन उलटला. त्याखाली दिनेश व अर्जुन दोघेही दबले गेले. तेथे मदतीसाठी कुणीही उपस्थित नव्हते.
काही वेळातच ट्रॅक्टरने अचानक पेट घेतला. आगीने संपूर्ण ट्रॅक्टर आपल्या कवेत घेतला. त्याच वेळी या रस्त्यावरून जाणाऱ्या एका तरुणीला हा प्रकार दिसला. तिने फोन करून ही माहिती आपल्या भावाला दिली. त्याने गावात माहिती देताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र आग विझविण्यासाठी काहीच उपाय नसल्याने दोघांचाही जागीच होरपळून मृत्यू झाला. या घटनेची माहिती गोबरवाही पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. शेतकरी ट्रॅक्टरमालक दिनेश हा अविवाहित होता. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.