रविंद्र चन्नेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, भंडारा (बारव्हा): सार्वजनिक गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान मार्गातील दुकानांच्या स्लॅबवर चढलेल्या लोकांचा भार सहन न झाल्याने सज्जा कोसळला. यात ९ महिला जखमी झाल्या. ही घटना लाखांदूर तालुक्यात बारव्हा या गावात बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान गावातील मुख्या बाजारपेठीच्या मार्गावरील इमारतीच्या छतावर उभे राहून अनेक महिला, मुले ही मिरवणूक पहात होते. दरम्यान, अंकुश रामदास बोकडे व शेषराव बाबुराव शिंदे यांच्या मालकीच्या इमारतीवरही मोठी गर्दी झाली होती. इमारत आधीच जूनी असल्याने भार सहन न झाल्याने इमारतीचा तीन फुटाचा सज्जा (पोर्च) खचला. यामुळे अनेकजण खाली कोसळले. या दुर्घटनेत ९ महिला जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
पोर्चच्या समोर टिनाचे शेड असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. समोर टिनाचे शेड नसते तर ३५ ते ४० लोकांचा जीव धोक्यात आला असता. विशेष म्हणजे, दुर्घटनाग्रस्त त्या शेडखाली घटनेच्या पाच मिनिटापूर्वी ४० ते ५० महिला शेडखाली विसर्जन मिरवणूक पहात होत्या. शेडखाली तीन दुचाकी होत्या. त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
जखमींमध्ये महिलाच अधिक
जखमींमध्ये महिुलांची संख्या अधिक आहे. त्यात अनिता राजेंद्र सोनवाणे (४५), मिना तिलकसिंह बैस (४०), प्रमिला शेखर जांभुळकर (४०), चंद्रकला मोहन सोनवाणे (४२), नुतन नरेंद्र नाकाडे (३६), दिपाली दिलीप घरडे (३५) या ६ महिला किरकोळ जखमी झाल्या. तर नंदिनी सुरेश शेंदरे (३०), अर्चना विजय देव्हारे (४०) या दोन महिलांसह रिया रेवाचंद शेंदरे (१५) ही मुलगी गंभीर जखमी आहे. किरकोळ जखमी झालेल्या महिलांना प्राथमिक आरोग्य केंद्रात त्वरीत दाखल करुन उपचार सुरू आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी चंद्रसुरेश डोंगरवार यांनी दिली. गंभीर जखमी झालेल्या महिलांना लाखांदूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.