भंडारा : गजबजलेल्या गांधी चौकात चार-पाच मुलांचे टोळके येते, वाद घालते आणि काही कळण्याच्या आत धारदार चाकू पोटातही खुपसते, हे कधीच कल्पना न केलेले चित्र दुर्दैवाने रविवारी रात्री भंडारा शहरात दिसले. यावरही कळस म्हणजे, संतप्त झालेला जमाव घटनास्थळी हल्लेखोरांना पकडून मारतो. एवढेच नाही तर, चक्क रुग्णालयातही त्याला बेदम मारहाण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो ! या सर्व घटना भंडारा शहराच्या शांततेला गुन्हेगारीचे ग्रहण लागल्याचेच तर दर्शवित नाही ना, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात आता निर्माण झाला आहे.
शांतीचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गांधी चौकात रविवारी वादातून रक्त सांडले. खुनाच्या घटनेनंतर रात्री सांडलेले रक्त सकाळी आणि दुपारनंतरही चौकातील रस्त्यावर सांडलेले होते. प्रत्यक्षात अशा घटनांमध्ये तातडीने नमुने घेऊन रक्त पुसले जाते. सर्वसामान्य नागरिकांच्या मनात त्यामुळे दहशत आणि भय पसरू नये, हा उद्देश असतो. मात्र दिवसभर घटनास्थळी सुकलेल्या रक्ताचे थारोळे कायम होते. ते पुसण्याची गरज संबंधित यंत्रणेला का वाटू नये, असाही प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.
रात्री १०.१५ वाजेच्या दरम्यान घटना घडल्यावर गांधी चौकात प्रचंड तणावाची स्थिती निर्माण झाली होती. जमावाचा उद्रेक आणि संताप लक्षात घेता पोलिसांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातही तातडीने बंदोबस्त लावण्याची गरज होती. मात्र याकडे दुर्लक्ष झाले. परिणामत: भर रुग्णालयात डॉक्टर आणि परिचारिकांसमोर जमावाने हल्लेखोराला पुन्हा बदडून काढले. या दहशतीमुळे डॉक्टर आणि परिचारिकांनी काम सोडून रुग्णालयाबाहेर धाव घेतली. त्यानंतर रात्री उशिरा चौकात सीआरपीएफच्या जवानांचा बंदोबस्त लावला गेला. मात्र वेळेचे गांभीर्य ओळखून हे आधीच व्हायला हवे होते, अशी अपेक्षा आज नागरिकांकडून ऐकावयास मिळाली.
संवेदनशिल चौकात घडताहेत घटना
शहरातील काही चौक आता संवेदनशील बनू पहात आहेत. आधीच अरुंद असलेल्या चौकात आणि रस्त्यांच्या बाजूने हातठेल्यांचे अतिक्रमण वाढत आहे. रात्री तर शहरातील काही चौक गजबजलेले असतात. अशा चौकांमध्ये पोलिसांचा पॉइंट कधीच लागलेला दिसत नाही.
गांधी चौक सुनसान
एरवी रोज सकाळी गजबजलेला असलेला गांधी चौक आज सोमवारी मात्र सुनसान होता. नागरिक टोळक्याटोळक्याने चर्चा करीत होते. पोलिसांचा बंदोबस्त दुपारनंतर मात्र या परिसरात दिसला नाही. सध्या परिस्थिती शांत आहे.