चंदन मोटघरेलोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने लाखनी ठाण्यांतर्गत येणाऱ्या ६१ गावांतील नागरिकांच्या सुरक्षेचा भार केवळ ४० पोलिसांवर आला आहे. कार्यरत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त जबाबदारी आल्याने कामाचा ताण वाढला आहे. लाखनी ठाण्याच्या कार्यक्षेत्रात ६१ गावे समाविष्ट असून, सुमारे एक लाख लोकसंख्या आहे. भंडारा तालुक्यातील ५ व साकोली तालुक्यातील ३ गावांचाही लाखनी ठाण्यात समावेश आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी लाखनी शहर, मुरमाडी, गडेगाव, पोहरा, पिंपळगाव, सालेभाटा अशा ६ बिटांची निर्मिती करण्यात आली आहे. बिटांची जबाबदारी पोलीस हवालदार किंवा पोलीस नायकांवर सोपविण्यात आली आहे. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शांतता व सुव्यवस्था राखणे, जातीय दंगली घडू नयेत, यासाठी प्रयत्न करणे, कार्यक्षेत्रात घडणाऱ्या घटनांचे गुन्हे दाखल करून तपास करणे, अवैध धंद्यांचे उच्चाटन करणे, सराईत गुन्हेगारांवर नजर ठेवणे, अती महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा करणे, गुन्ह्यांचा तपास करणे, तथा शासनाने सोपवून दिलेली कर्तव्य बजावणे, ही प्रमुख कामे आहेत. मात्र, कर्तव्य बजावण्यात अधिक वेळ खर्ची होत असल्याने मानसिक ताण सहन करावा लागतो. दिलेली जबाबदारी वेळेत पार पाडली नाही तर अधिकाऱ्यांकडून बोलणी खावी लागतात. त्यासाेबतच कौटुंबीक जबाबदारीही असतेच. त्यामुळे अकारण मनस्ताप सहन करावा लागतो.
मानसिक तणाव- लाखनी ठाण्याच्या हद्दीतून राष्ट्रीय महामार्ग जातो. केव्हा अपघात होईल याचा नेम नसतो. त्यामुळे २४ तास कर्तव्य बजावावे लागते. त्याचा मानसिक त्रास सहन करावा लागतो. अधिक वेळ कर्तव्य बजावण्यात जात असल्यामुळे कुटुंबालाही वेळ देता येत नाही. त्यामुळे कौटुंबीक कलह नित्याचीच बाब झाली आहे.
६० पदे मंजूर, २० रिक्त- लाखनी ठाण्यात पोलीस निरीक्षक एक, सहाय्यक निरीक्षक एक, पोलीस उपनिरीक्षक चार आणि पोलीस कर्मचारी ६० अशी पदे मंजूर आहेत. त्यातील ४० पदे भरलेली असून, २० पदे रिक्त आहेत. मंजूर पदांपैकी ३५ टक्के कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. ४० कर्मचाऱ्यांपैकी तीन पाळीत स्टेशन डायरीसाठी नऊ कर्मचारी, न्यायालयीन कर्तव्य दोन, चालक तीन, साप्ताहिक सुट्टीत दररोज तीन ते चार कर्मचारी असतात. उर्वरित २५ पोलीस कर्मचाऱ्यांना सर्व जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात.