सिराज शेख
मोहाडी (भंडारा) : मिरचीच्या शेतात ठिय्या मांडून बसलेल्या वाघिणीला वनविभागाच्या पथकाने शार्प शूटरच्या मदतीने बेशुद्धीचे इंजेक्शन मारून अखेर जेरबंद करण्यात आले. मोहाडी तालुक्यातील मांडेसर येथे बुधवारी सकाळी ७ वाजता दिसलेली वाघीण दुपारी ४ जेरबंद झाल्याने शेतकऱ्यांसह गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, शेतात वाघिणीला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची एकच गर्दी झाली होती. त्यामुळे वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाच्या पथकाला अडचण येत होती.
तालुक्यातील मांडेसर येथील बालचंद दमाहे यांच्या मिरचीच्या शेतात बुधवारी सकाळी ६ वाजता गावातील एका व्यक्तीला वाघीण दिसली. घाबरून जाऊन तो झाडावर चढला. तेथूनच त्याने आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून गावात पाठविला. हा प्रकार माहित होताच गावकऱ्यांनी शेताकडे धाव घेतली. शेतातील एक झुडुपात वाघीण दिसली. नागरिकांच्या गोंगाटाने वाघ झुडपातून बाहेर निघाला. मात्र घाबरून दुसऱ्या झुडपात लपला. या प्रकाराची माहिती वनविभागाला देण्यात आली.
उपवनसंरक्षक राहुल गवई, सहायक वनसंरक्षक साकेत शेंडे, कांद्री वनपरिक्षेत्र अधिकारी अपेक्षा शेंडे, मोहाडीचे ठाणेदार राहुल देशपांडे, आंधळगावचे ठाणेदार राजकुमार, क्षेत्र सहाय्यक डी. बी. वानखेडे, वनरक्षक एस. आर. बघेले यांच्यासह वनविभाग व पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांचा मोठा कोलाहल असल्याने वाघाला जेरबंद करणे कठीण जात होते. त्यांनतर वनविभागाच्या शीघ्र कृती दलालाही पाचारण करण्यात आले. दुपारी ४ वाजता शार्प शूटरच्या मदतीने बेशुद्धीचे इंजेक्शन मारून अखेर जेरबंद करण्यात आले. दुसरीकडे शेतकऱ्याच्या मिरचीचे संपूर्ण शेत गावकऱ्यांच्या पायाखाली तुडविले जावून लाखोंचा नुकसान झाला आहे.
दोन दिवसांपासून तळ
मांडेसर येथील दमाहे यांच्या शेतात वाघिणीने दोन दिवसांपासून तळ ठोकला होता. दोन दिवसांपूर्वी शेखर कस्तुरे यांच्या शेतात एक रानडुकराची शिकार वाघिणीने केली होती. त्यानंतर या परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
वाघिणीला सोडणार निसर्ग अधिवासात
वनविभागाने जेरबंद वाघिणीला जेरबंद केल्यानंतर एका मोठ्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले. ही वाघीण दोन वर्षाची असून तिला निसर्ग अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे भंडाराचे उपवनसंरक्षक राहुल गवई यांनी सांगितले. पिंजऱ्यावर हिरवा कापड झाकण्यात आल्याने कुणालाही वाघाचे दर्शन झाले नाही.
गावकऱ्यांची हुल्लडबाजी
शेतात वाघीण असल्याचे माहीत होताच गावकऱ्यांनी धाव घेतली. हजारो नागरिक तेथे गोळा झाले होते. वाघाला मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी धडपड सुरू होती. एका झुडुपात लपलेली वाघीण बाहेर आली तेव्हा एक कोलाहल झाला. या कोलाहलाने वाघीण घाबरून दुसऱ्या झुडुपात लापली. नागरिकांच्या हुल्लडबाजीने वनविभागही त्रस्त झाला होता. सांगूनही गावकरी मागे हटायला तयार नव्हते. अखेर पोलिसांच्या मदतीने गावकऱ्यांना शेताबाहेर काढले आणि वाघिणीला जेरबंद केले.
शीघ्र बचाव दलाचे तीन पथक
मांडेसर येथे वाघीण निघाल्याची माहिती होताच वनविभागाचे पथक पोहोचले. सकाळी ११ वाजतापासून वाघिणीला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. गोंदिया, भंडारा आणि नवेगाव-नागझिरी येथील शीघ्र बचाव दलाचे तीन पथक दाखल झाले. नवेगाव-नागझिरा अभयारण्याच्या पशुवैद्यकांच्या मदतीने बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन मारण्यात आले. काही वेळातच वाघीण बेशुद्ध झाली. वनविभागाच्या पथकाने वाघिणीला एका पिंजऱ्यातून तुमसर तालुक्यातील चिंचोली येथील लाकूड आगारात नेले.