पोलिसात तक्रार : चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणीपवनी : पवनी शहराजवळील ऐतिहासिक, प्राचीन जगन्नाथ टेकडीच्या खाली असलेल्या २,५०० वर्षापूर्वीच्या सम्राट अशोककालीन ऐतिहासिक प्राचीन बौद्ध स्तुपातील तथागत गौतम बुद्ध यांचे शिर्ष अज्ञात चोरांनी चोरून नेले आहे. यासंबंधीची तक्रार सामाजिक कार्यकर्ते, माजी न्यायाधीश महेंद्र गोस्वामी यांनी पवनी पोलीस ठाण्याला दिली आहे.पवनीजवळील तहसील कार्यालयाजवळ असलेल्या जगन्नाथ टेकडीच्या खाली २,५०० वर्षापुर्वीच्या ऐतिहासिक, प्राचीन बौद्ध स्तुप सापडला आहे. हा स्तुप मौर्यपूर्व काळातील असून सम्राट अशोकाच्या काळात या स्तुपाची वाढ करण्यात आली, तर सातवाहन काळात या स्तुपाची दुरूस्ती करण्यात आली. याची नोंद तिथे सापडलेल्या शिलालेखामध्ये आहे. या स्तुपामध्ये तथागत गौतम बुद्ध यांच्या अस्थिधातू ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे हा स्तुप अत्यंत पवित्र व फार महत्वाचा समजला जातो. हा स्तुप संपूर्ण भारतातील सर्वात मोठा भव्य स्तुप असून त्याची देखरेख व मालकी पुरातत्व विभाग भारत सरकार यांची आहे.या स्तुपाचे उत्खनन पुरातत्व विभागाचे डॉ. देव व डॉ. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सन १९६९-७० मध्ये केले असून याचा अहवाल पुस्तक रूपाने प्रकाशित झाला आहे. त्यानुसार पवनीची नोंद आंतरराष्ट्रीय नकाशावर झाली आहे. या स्तुपाच्या उत्खननात सापडलेल्या बऱ्याच मुर्त्या, नक्षीखांब, वेदीका, सिलालेख आदी मुंबई व दिल्ली येथील प्राचीन वस्तु संग्राहालयात ठेवण्यात आल्या आहेत. उर्वरित अवशेष, नक्षीकाम केलेले खांब, शिलालेख जगन्नाथ मंदीर परिसरात विखुरलेले आहेत. हे शिलालेख खांब इतिहासाच्या दृष्टीने फार महत्वाचे व मौल्यवान असून त्यावर ब्राम्हीलिपीत दान देणाऱ्यांचा उल्लेख दगडावर कोरलेला आहे. त्यामुळे या शिलालेख व खांबांची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यावधी रूपये आहे. या स्तुपाच्या उत्खननात भगवान बुद्धाचे २,५०० वर्षापुर्वीचे शिर्षदेखील सापडले होते. ते पुरातत्व विभागाने जगन्नाथ मंदिराच्या पायथ्याशीच चबुतऱ्यावर ठेवले होते. पवनीला येणारे पर्यटक उत्खननात सापडलेल्या प्राचीन अवशेषांचे ऐतिहासीक महत्व समजून दर्शन घेत होते. तसेच बरेच संशोधक देखील या अवशेषांचे संशोधन व अभ्यास करीत होते. जगन्नाथ मंदिराची वहीवाट देशकर कुटूंबियाकडे आहे. तेच या मंदिराची देखरेख करीत असतात. पुरातत्व विभागाचे या स्तुपाकडे दुर्लक्ष असून तिथे कोणीही चौकीदार नाही. या मंदिराच्या ओट्यावर बाहेर ठेवलेले बुद्धाच्या मुर्तीचे शिर्ष अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची माहिती होताच या स्तुपाला भेट दिली. दरम्यान शिर्ष नसल्याचे आढळून आले. सामाजिक कार्यकर्त्यांनी याची माहिती पुरातत्व विभागाला दिली. पण पुरातत्व विभागाने चोरीची तक्रार दिली नाही. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते, माजी न्यायाधीश अॅड. महेंद्र गोस्वामी यांच्या नेतृत्वाखाली डॉ. शैलेष सुर्यवंशी, अरविंद धारगावे, मनोहर मेश्राम, रमेश मोटघरे, बंडू रामटेके यांनी प्रभारी ठाणेदार उईके यांच्याकडे बुद्ध मुर्तीचे शिर्ष चोरी प्रकरणी तात्काळ चौकशी करून, गुन्हा नोंदवून दोषींवर कार्यवाही करण्याच्या मागणीची तक्रार दिली आहे. (तालुका प्रतिनिधी)
टेकडीच्या बौद्ध स्तुपातील बुद्ध मूर्तीच्या शिर्षाची चोरी
By admin | Published: June 26, 2016 12:24 AM