लाेकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर तालुक्यातील पांजरा रेती घाटावरील ४०० ब्रास रेती साठा महसूल प्रशासनाने जप्त केला होता. हा रेतीसाठा चोरीला गेला. याबाबत तहसीलदारांनी सिहोरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. परंतु दीड महिन्यानंतरही रेती चोरीचा अद्याप सुगावा लागला नाही. त्यामुळे पाणी कुठेतरी मुरत असल्याचे दिसून येते.पांजरा गावाजवळून वैनगंगा नदी वाहाते. येथील नदीपात्रात उच्च दर्जाची व गुणवत्ता प्राप्त रेतीचा मुबलक साठा आहे. रेती तस्करांनी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन करून नदीकाठावर साठा करून ठेवले होता. याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाल्यानंतर मसूर महसूल प्रशासनाने चारशे ब्रास रेतीसाठा जप्त केला होता. रेतीच्या देखरेखीकरिता पोलीसपाटील व तलाठी यांची नियुक्ती केली होती. परंतु त्यानंतरही येथील रेती चोरीला गेली.याची दखल घेत तहसीलदार बाळासाहेब तेळे यांनी सिहोरा पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविली. या घटनाक्रमाला दीड महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला तरी अद्याप रेती चोरीचा सुगावा लागला नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात नदीपात्रातून रेती उत्खनन करणे, महसूल प्रशासनाने जप्त केलेली रेती चोरीला जाणे, हा सगळा प्रकार संशयास्पद वाटतो.दुसरीकडे घरकुल लाभार्थ्यांना नदीपात्रातून रेती घेऊन जाण्यास मनाई करण्यात येते, तर दुसरीकडे रेतीची सर्रास चोरी होते, हा सगळा प्रकार संशयास्पद वाटतो. ४०० ब्रास रेती चोरीला गेल्यामुळे महसूल प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे महसूल विभागाचेही आर्थिक नुकसान झाले. या प्रकाराला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पांजरा रेती घाटातून रेती चोरी झाली. त्यासंदर्भात सिहोरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.-बाळासाहेब तेळे,तहसीलदार, तुमसर.