अर्थकारणामुळे कारवाई शून्य : नदीपात्रात दिसते माती
भंडारा : जीवनदायिनी वैनगंगा नदीपात्रातून बेसुमार रेतीचा उपसा करून भरदिवसा रेतीची चोरी सुरू आहे. माडगी येथे हा प्रकार सर्रास सुरू असून अर्थकारणामुळेच कारवाई शून्य आहे असे दिसून येते. रेती तस्करांनी येथील नदीपात्रात तळातील माती दिसेपर्यंत रेतीचा उपसा केला आहे; परंतु महसूल विभागाचे अधिकारी इकडे फिरकत नाहीत. गावाशेजारी रेतीचा प्रचंड मोठा साठा रेती चोरीची साक्ष देत आहे.
तुमसर तालुका मुख्यालयापासून केवळ आठ किलोमीटर अंतरावर या गावाजवळून पैनगंगा नदी वाहते. येथील नदीपात्रात रेतीच्या मोठा साठा होता. परंतु रेती तस्करांची वक्रदृष्टी या रेती घाटावर पडली. गावाच्या रस्त्याने नदीपात्रात प्रवेश करून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी सुरू केली. गावाशेजारीच रेतीचा प्रचंड मोठा साठा करून ठेवला. हा साठा येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतो. रेती तस्करांची टोळी येथे दिवसभर पहारा देते त्यामुळे त्यांच्याबद्दल कोणीही बोलायला तयार नाही.
बॉक्स
नदीपात्र केले विद्रूप
माडगी घाटातून राजरोसपणे रेती तस्करांनी रेतीचा बेसुमार उपसा केला. त्यामुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत. नदीतील तर दिसेपर्यंत रेती तस्करांनी नदीला पोखरून टाकले आहे. त्यामुळे नदीपात्राचे अस्तित्व धोक्यात आले आहे. माडगे येथील नदीघाट हा एक खड्डा असल्याचे दिसून येते. पर्यावरणाच्या हानीसोबतच महसूलचे कोट्यवधी रुपये येथे बुडाले आहेत. घाट लिलाव नसताना रेती तस्कर दिवसाढवळ्या रेतीचा उपसा कसा करतात हा संशोधनाचा विषय आहे.
बॉक्स
कारवाई का नाही
महसूल प्रशासनाचे महसुलापोटी लाखो रुपये बुडत असताना महसूल प्रशासन कारवाई का करत नाही हे न उलगडणारे कोडे आहे. प्रशासनाचे लक्ष घेतल्यानंतरही कारवाई होत नसल्याने मुजोर रेती तस्कर राजरोसपणे रेतीची चोरी करीत आहेत. या रेती चोरांना कुणाचा आशीर्वाद आहे असा प्रश्न इथे उपस्थित होतो. राष्ट्रीय महामार्गावरील माडगी येथे हा प्रकार सुरू आहे.
बॉक्स
सेटिंगची चर्चा
माडगी येथील रेती चोरीप्रकरणी रेती तस्करांनी सेटिंग केल्याची चर्चा आहे. ती सेटिंग कुणासोबत केली याबाबत परिसरातील नागरिकांना उत्सुकता लागली आहे. रेती तस्करांनी रेतीचा उपसा करण्याकरिता अर्थकारण केल्याचे बोलले जात आहे. थेट जिल्हाधिकाऱ्यांनी या घाटातील रेती चोरी थांबवून महसूल प्रशासनाचे होणारे नुकसान थांबवून पर्यावरणाची हानी टाळावी.