तुमसर : आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्पाअंतर्गत तुमसर तालुक्यातील रामपूर हमेशा पुनर्वसन गावात आठ टिनाचे तात्पुरते निवारे प्रकल्पग्रस्तांकरिता तयार केले होते. त्यातील दोन निवाऱ्यांचे साहित्य चोरीला गेले आहेत. एका टीन निवाऱ्याकरिता २ लक्ष ७८ हजाराचा खर्च येथे आला होता. नियोजनाच्या अभावी शासनाच्या पैशाचा चूराडा येथे होत आहे.बावनथडी प्रकल्पातील बाधीत कमकासूर येथील ५१ कुटूंबाचे पुनर्वसन रामपूर हमेशा येथे शासनाने केले आहे. या प्रकल्पग्रस्तांकरिता शासनाने तात्पुरते आठ टिनाचे निवारे शेड तयार केले होते. एका निवाऱ्याची किंमत २ लाख ७८ हजार आहे. आठ पैकी दोन टिनाचे निवाऱ्यांचे साहित्य चोरट्यांनी काढून नेले. यासंदर्भात अजूनपर्यंत पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली नाही. या संधीचा फायदा घेवून अन्य सहा टिनशेड असेच चोरीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. नियोजनाचा अभावी शासनाच्या पैशाचा असा चूराडा येथे होत आहे.हे टिनशेड निवारे उन्हाळ्यात २०१२ मध्ये तयार करण्यात आले होते. विस्थापितांना नागरी सुविधांची कामे पूर्ण होण्यास अवधी लागणार होता. त्याकरीता त्यांची तात्पूरती सोय या टीन शेड निवाऱ्यात करण्यात आली होती. प्रकल्प अधिकाऱ्यांनी टीनशेड गोसेखुर्द पुनर्वसन विभागाला पत्र लिहून ते नेण्याची विनंती केली होती, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनाही या टीनशेड इतरत्र हलविण्यासंदर्भात माहिती देण्यात आली होती. पुनर्वसन झाल्यानंतर ही टीन शेड कुलूपबंद आहेत. येथे स्वस्त धान्य दुकान तथा समाजमंदिराकरीता ही उपयोगात आणली जाऊ शकतात. सध्या पंचायत समिती कार्यालयाकडे याची देखरेख आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास शिल्लक सहा टिन निवारे येथे चोरीला जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात पंचायत समिती प्रशासन अनभिज्ञ आहे. खंडविकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्या उपलब्ध नाहीत. (तालुका प्रतिनिधी)
बावनथडी प्रकल्पग्रस्तांच्या ‘टिनशेड’ची चोरी
By admin | Published: January 31, 2015 11:13 PM