मोहन भोयर लोकमत न्यूज नेटवर्क तुमसर : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक २० नोव्हेंबर रोजी होत आहे. तुमसर विधानसभा मतदारसंघ हा राज्याच्या शेवटच्या टोक असून या तुमसर मतदार संघाच्या सीमेलगत मध्य प्रदेशाची सीमा आहे. मध्य प्रदेशाच्या सीमेवरील १६ गावांचा समावेश आहे. येथे स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांनी सहा चेक पोस्ट लावले आहेत.
तुमसर तालुक्यातील मध्य प्रदेशाच्या सीमेलगत चिखली, देवनारा, बाजारटोला, चांदमारा, लोभी, आष्टी, नाकाडोंगरी, पाथरी, कवलेवाडा, सोंड्या, वारपिंडकेपार, महालगाव, देवसर्रा, बपेरा (सि.) आदी १६ गावे आहेत.
तुमसर मोहाडी विधानसभेत २८ सप्टेंबरच्या नोंदीनुसार एकूण मतदारांची संख्या ३,०९,०८१ इतकी असून त्यात पुरुष मतदारांची संख्या १,५५,१५० तर महिला मतदारांची संख्या १,३३,९३० इतकी आहे. या मतदारसंघात दोन तालुके असून यापैकी तुमसर तालुक्यात एकूण मतदान केंद्रांची संख्या ३५३ आहे. तुमसर तालुक्यात मतदान केंद्राची संख्या २०८ तर मोहाडी तालुक्यात १४५ मतदान केंद्र आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली आंतरराज्यीय सिमा चेक पोस्ट बैठकनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंगरी (बु) मॉईल येथे आंतरराज्य सिमा चेक पोस्ट बैठक पार पडली. या बैठकीमध्ये महाराष्ट्र-मध्यप्रदेश राज्याचा समन्वय साधून कामकाजाबाबत आढावा घेण्यात आला. बैठकीला पोलिस विभागाअंतर्गत नागपूर क्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. दिलीप भुजबळ, बालाघाटचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय कुमार, जिल्हाधिकारी संजय कोलते, गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर, भंडाराचे पोलिस अधीक्षक नुरुल हसन, गोंदियाचे गोरख भामरे, अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे, पोलिस अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग गोंदिया व ईतर वरीष्ठ अधिकारी बैठकीला हजर होते. या अधिकाऱ्यांनी बावनथडी, बपेरा चेकपोस्ट येथे भेट देवून दोन्ही राज्याच्या सिमा सुरक्षीततेबाबत आढावा घेतला.
सहा गावाजवळ चेक पोस्टनिवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा पोलिस प्रशासनाने सहा चेक पोस्ट लावण्यात आले आहेत. त्यात हिवरा, पाहुनी, बपेरा (सी.) पाथरी, देवनारा, देव्हाडा बु. या गावांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी पोलिसांचा आणि महसूल विभागातील अधिकाऱ्यांचा चोख बंदोबस्त राहणार आहे.
मतदानाची अशी होती टक्केवारी लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये तुमसर विधानसभा मतदारसंघात एकूण मतांची टक्केवारी ७०.२६, विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये मतदानाची टक्केवारी ७०.५१ तर लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये मतदानाची टक्केवारी ६७.५३ टक्के होती.