विनोद पँटूला : पटेल महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन
भंडारा : जैवविज्ञानशास्त्रामध्ये विविध पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी त्यामध्ये आवड निर्माण करुन कौशल्य प्राप्त करावे व उपलब्ध असलेल्या रोजगार व स्वयंरोजगाराची संधीचा फायदा विद्यार्थ्यांनी येणाऱ्या काळात अवश्य घ्यावा असे प्रतिपादन बायोलॉजिकल इ लिमिटेड हैदराबादचे सहाय्यक महाव्यवस्थापक डॉ. विनोद पँटूला यांनी केले. येथील जे. एम. पटेल महाविद्यालयात आभासी पद्धतीने आयोजित राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
जैवविज्ञानाच्या संबंधित असलेल्या स्टार्टअप उद्योगाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांनी स्वयंरोजगाराकडे वळावे असे मत व्यक्त केले. सिनजिने इंटरनॅशनल लिमिटेड बेंगलोरच्या वरिष्ठ सहाय्यक संशोधक सुनीता चंदेल यांनी विद्यार्थ्यांना अतिशय विपरित व कठीण परिस्थितीत आयुष्याचे उद्दिष्ट कसे साधावेत व खऱ्या अर्थाने आयुष्यात यशस्वी कसे व्हावे याबाबत आपल्या स्वानुभवावरून ‘माय सक्सेस स्टोरी’ या विषयावर व्याख्यान करताना केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. कार्तिक पनिकर, विज्ञान मंडळाचे समन्वयक डॉ. एस.डी. बोरकर तसेच डीबीटी - स्टार कॉलेज स्किमचे समन्वयक डॉ. श्याम डफरे उपस्थित होते. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या अनुषंगाने २२ ते २८ फेब्रुवारी दरम्यान विज्ञानातील अनेक विषयांवर विविध उपक्रम व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. विद्यार्थ्यांना विशेष प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विज्ञान मंचाचे सर्व सदस्यांनी सहकार्य केले. संचालन वनस्पती शास्त्राच्या डॉ. अपर्णा यादव यांनी तर आभार रसायनशास्त्राचे डॉ. जी. बी तिवारी यांनी मानले.