भंडारा : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर धर्मादाय रुग्णालयाच्या हलगर्जीमुळे एका गर्भवती महिलेला आपले प्राण गमवावे लागले. या घटनेनंतर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आले आहे. याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांनी जिल्हा धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयात बैठक घेऊन रुग्णसेवेचा आणि सुविधांचा आढावा घेतला होता. यात जिल्ह्यात दोन धर्मादाय रुग्णालये आहेत.
या दोन्ही रुग्णालयांकडून रुग्णांना सेवा देण्याचा चांगला प्रयत्न होत असला तरी मल्टिस्पेशालिटी सेवा नसून, फक्त दोनच प्रकारच्या रुग्णसेवा उपलब्ध आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी मिलिंद सोमकुवर, जिल्हा शल्यचिकित्सक दीपचंद सोयाम, जिल्हा धर्मादाय आयुक्त नीलिमा मालोदे यांच्यासह धर्मादाय संस्थांचे प्रतिनिधी डॉ. भगवान म्हस्के, मनीष बलवानी उपस्थित होते. आवश्यक सूचना उपस्थितांनी दिल्यात.
नॅचरोपॅथी आणि नेत्र रुग्णालयजिल्ह्यात केवळ तेही भंडारा शहरातच दोन धर्मादाय रुग्णालये आहेत. संत गुलाबबाबा योग प्राकृतिक चिकित्सालय व अनुसंधान केंद्र तकीया वार्डात आहे. २००० मध्ये स्थापन झालेल्या या रुग्णालयात फक्त नॅचरोपॅथी उपचार (पंचकर्म चिकित्सा व प्राकृतिक चिकित्सा) केले जातात. दुसरा धर्मादाय दवाखाना सुंदरानी चॅरिटेबल नेत्र चिकित्सालय या संस्थेच्या वतीने चालविला जातो. यात फक्त डोळ्यांवर उपचार केले जातात.
या रुग्णालयात कुठल्या सरकारी सुविधा मिळतात?वार्षिक उत्पन्न १ लाख ६० हजार रुपयांपर्यंत असलेल्या रुग्णांसाठी १० टक्के खाटा व ५० टक्के सवलतीच्या दरात उपचारांकरिता खाटा आरक्षित ठेवणे धर्मादाय रुग्णालयांना बंधनकारक आहे. उपचाराबाबत काही अडचण आल्यास संबंधित धर्मादाय निरीक्षक अथवा कार्यालयाशी संपर्क साधून लेखी तक्रार मांडता येते. १८००२२२२७० हा टोल फ्री क्रमांक असून, यावर संपर्क करता येतो. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून धर्मादाय आयुक्त निर्णय देतात.
तर होऊ शकेल सोय !आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कुटुंबांतील रुग्णांना वेळेवर आरोग्य सेवा-सुविधा मिळाव्यात, कुठल्याही रुग्णाची उपचारांसाठी परवड होऊ नये म्हणून धर्मादाय कार्यालयांतर्गत जिल्ह्यात नोंदणीकृत रुग्णालय सुरू करता येते. त्या रुग्णालयात विनामूल्य, ५० टक्के सवलतीच्या दरात वैद्यकीय सेवा, शस्त्रक्रिया करण्यात येतात. त्यामुळे दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारांसाठी पदरमोड करावी लागत नाही. याशिवाय, गोळ्या-औषधी शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार दिल्या जातात. परंतु जिल्ह्यात अजून तरी दोनच धर्मादाय रुग्णालय असून, रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयांसह आरोग्य संस्थांत काही मोफत, तर काही सवलतीच्या दरात उपचार केले जातात. या धर्मादाय रुग्णालयांची संख्या वाढणे गरजेचे आहे. जेणेकरून अशा गरजू रूग्णांची सोय होऊ शकेल.