मोहन भोयर
तुमसर (भंडारा) :भंडारा-तुमसर-बालाघाट आंतरराज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरण मागील दोन वर्षापासून रखडले आहे. दोन वर्षांपूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री यांनी सदर रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केला होता, हे विशेष.
यासंदर्भात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक (तांत्रिक) व प्रकल्प संचालक यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंत्यांना कळविले आहे. त्यामुळे सध्या या रस्त्याची मालकी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असून भंडारा ते तुमसर व पुढे बपेरापर्यंत रस्त्यावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांची दुरुस्ती न होण्यास सार्वजनिक बांधकाम विभागच जबाबदार असल्याचे दिसत आहे.
भंडारा- तुमसर- बपेरा- बालाघाट हा आंतरराज्य महामार्ग असून या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्र्यांनी दोन वर्षांपूर्वी घोषित केला होता. परंतु अजूनपर्यंत कामाला सुरुवात झाली नाही. या रस्त्यावर जागोजागी जीवघेणे खड्डे पडले आहेत. त्यामुळे हा रस्ता मृत्यूमार्ग ठरत आहे.
भंडारा ते तुमसर हा मार्ग अतिशय खराब झाला असून रोज लहान मोठे अपघात घडत आहेत. दीड वर्षापूर्वी भंडारा शहरातील शास्त्रीनगर चौक ते आयटीआयपर्यंतच्या रस्त्याला ठिगळ लावण्यात आले होते. मात्र त्यानंतरच्या महामार्गाची अवस्था तशीच ठेवण्यात आली. असंख्य खड्ड्यांमुळे वाहतूक जीवघेणी झाली आहे. गत सहा महिन्यात अपघातामुळे सात जणांचा मृत्यू झाला तर १४ जण जखमी झाले आहेत.
जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडेच
भंडारा-तुमसर-बपेरा हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरणाचा प्रस्ताव दाखल केला आहे. परंतु सदर मार्गाचे अजूनपर्यंत हस्तांतरण झाले नाही. मार्गावरील खड्ड्यांच्या डागडुजीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असली तरी फक्त खड्ड्यात मुरूम भरण्याचा सोपस्कार पार पाडणे सुरू आहे. तांत्रिक अडचणीमुळे हा मार्ग हस्तांतरित न झाल्याने आता सार्वजनिक बांधकाम विभागालाच या मार्गाची दुरुस्ती करावी लागणार आहे.
राजकीय उदासीनता
राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतरही राजकीय उदासीनतेपोटी राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाकडे रस्ता हस्तांतरणाच्या प्रस्तावाला चांगलाच उशीर झाला आहे. जिल्ह्यातील बरीच अशी विकासात्मक कामे राजकीय धोरणांमुळे मागे पडत असल्याचेही दिसून येतात. वर्षानुवर्षे योजना कार्यान्वीत होत नसल्याने त्याचा लाभही जनसामान्यांपर्यंत पोहचत नाही. दोन दशकांपासून रस्त्याची समस्या कायम असताना त्याकडे दुर्लक्ष का करण्यात आले हे एक न समजणारे कोडे आहेत.
तक्रारीतून झाला खुलासा
शिवसेनेचे विभागप्रमुख अमित मेश्राम यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे भंडारा-तुमसर-बपेरा-बालाघाट या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याची तक्रार केली होती. त्यावर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक व प्रकल्प संचालक डॉ. अरविंद काळे यांनी अमित मेश्राम यांना सदर रस्ता महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झाला नसल्याचे कळविले. या पत्रातून हा खुलासा झाला आहे.