प्रकरण शिक्षकांच्या बदलीचे : लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांना निवेदनसाकोली : शिक्षकांच्या झालेल्या बदल्यामध्ये भंडारा जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातील बदल्यांना योग्य न्याय मिळाला असल्यामुळे शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्यात येऊ नये, अशी मागणी शिक्षकांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.यावर्षी मे महिन्यात झालेल्या जिल्हा परिषद शिक्षक बदल्यांमध्ये आतापर्यंत १५ ते २० वर्षांपासून बदलीसाठी प्रतिक्षीत असलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना त्यांच्या विनंतीच्या ठिकाणी जाण्याची संधी मिळाली. यामध्ये नक्षलग्रस्त भाग नसलेल्या ठिकाणाहून काही शिक्षकांना नक्षलग्रस्त भागात जावे लागले. यात त्यांच्यावर कुठलाही अन्याय झालेला नाही. परंतु अन्याय झाल्याचा कांगावा केला जात आहे.अन्याय झालेल्यांच्या बदल्या रद्द कराव्यात. मात्र ज्यांच्यावर अन्याय झालाच नाही त्या बदल्या रद्द करून त्या शिक्षकांवर अन्याय करू नये. पाच टक्के अन्याय झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी ९५ टक्के न्याय झालेल्या बदल्या रद्द करणे हा मोठा अन्याय होईल. नक्षलग्रस्त भागातील कर्मचाऱ्यांनी एकाच ठिकाणी किती दिवस नोकरी करायची, नक्षलग्रस्त भागातील बदल्या या नियमानुसार विनंतीपुर्वक व अटी पुर्ण करणाऱ्यांच्याच झालेल्या आहेत. या भागातील कोणत्याही शिक्षक कर्मचाऱ्यांची किंवा कर्मचारी संघटनांची अन्याय झाल्याबाबद तक्रार नाही. मात्र अलिकडे शिक्षकांच्या बदल्यावरून मोठे राजकारण दिसून येत आहे. शिक्षकांवर अन्याय झाल्याचा प्रकार जणू सर्व शिक्षकांवर झाला, असे भासविण्याचा प्रकार आहे. शिक्षकांवर बदल्या रद्द करून अन्याय करू नये, अशी मागणी प्रकाश चाचेरे, बी.के. मुंगमोडे, एस.ए. हर्षे, आर.जी. बडोले, एन.टी. गायधने, एम.एल. पुस्तोडे, एस.ए. धकाते, छगन मांढरे, ए.एस. चांदेवार, पी.बी. सार्वे, एस.एस. मेश्राम, रजनी करंजेकर, टी.के. धुर्वे, नामदेव धकाते, गोपाल गडपायले, रामकृष्ण हातझाडे, गोवर्धन सोनकुसरे या शिक्षकांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे. या मागणीच्या प्रतिलीपी मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, शिक्षणमंत्री, शिक्षण सहआयुक्त नागपूर, मुख्य कार्यपालन अधिकारी भंडारा, खासदार पटोले, आमदार बाळा काशीवार, आमदार चरण वाघमारे, जिल्हा परीषद अध्यक्ष यांना दिलेल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)
शिक्षकांवर अन्याय झाला नाही
By admin | Published: June 16, 2016 1:02 AM