प्रधानमंत्री, मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार: मनीष कापगते यांची माहितीसाकोली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी व लोककल्याणकारी पंतप्रधान आवास योजनेच्या वेबसाईटवर लाभार्थी गावांच्या यादीत साकोली नगरपरिषदेचा उल्लेख नसल्याने साकोली सेंदूरवाफा येथील नागरिक या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता नगरसेवक अॅड.मनीष कापगते यांनी व्यक्त केली. त्यांनी प्रधानमंत्री कार्यालय दिल्ली व मुख्यमंत्री कार्यालय मुंबई यांचे लक्ष वेधण्यासाठी पत्रव्यवहार सुरु केला आहे.प्राप्त माहितीनुसार, ३ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना घरकुल देण्याची योजना संपूर्ण देशभरात राबविण्याचे धोरण असून (ई.डब्लू.एस.) श्रेणी व (एल.आय.जी.) श्रेणी अशा या २ श्रेणीच्या माध्यमातून कार्यान्वित करण्याची योजना आहे. यासाठी आॅनलाईन अर्ज नागरिकांना करावयाचे आहे. यासाठी संपूर्ण देशात ६० हजार केंद्र घोषित करण्यात आले आहे. या वेबसाईटवर भंडारा जिल्ह्यातील लाभार्थी नगरपरिषदेची नावे घोषित झाली आहे. त्यात साकोली नगरपरिषदेचे नाव नाही. केवळ भंडारा, पवनी व तुमसर या तीनच नगरपरिषदेचा यात उल्लेख आहे. त्यामुळे साकोली नगरपरिषदेअंतर्गत येणाऱ्या गरीब व गरजूंना या योजनेपासून वंचित राहावे लागणार असल्याचे शक्यता आहे.वेबसाईटवर गरजूंनी अर्ज भरावयाचे होते. पण या संकेतस्थळावर माहिती घेतली असता ही बाब निदर्शनास आली. साकोली ग्रामपंचायतचे आधी नगरपंचायतमध्ये रुपांतर झाले. पण या साकोली नगरपरिषद करण्याच्या प्रयत्नात बराच कालावधी लोटल्यामुळे साकोलीचे नाव आले नसावे, तसेच जिल्ह्यातील लाखनी, लाखांदूर, मोहाडी व इतर नगरपंचायतीचे नाव सुद्धा संकेतस्थळावर दिसले नाही.जिल्हाधिकारी तसेच संबंधित विभागाने याबाबीचा शोध घेऊन स्पष्टीकरण करावे. जेणेकरून गरजू नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेता येईल, अशी मागणीही नगरसेवक अॅड.मनिष कापगते यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
'वेबसाईट'वर साकोली नगरपरिषदेचा उल्लेख नाही
By admin | Published: February 12, 2017 12:25 AM