लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोनाच्या कठीण काळात कुणीही उपाशीपोटी राहू नये यासाठी राज्य शासनाने शिवभोजन थाळी सुरू केली. यासाठी मोठ्या प्रमाणात शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रचालकांना शासनाकडून प्रती थाळी अनुदान ठरवून देण्यात आले आहे. जिल्ह्यात ३८ केंद्रांच्या माध्यमातून गरजूंसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. या शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून २६ जानेवारी २०२० पासून आतापर्यंत ५ लाख नागरिकांना भोजन देण्यात आले. गरजूंचे पोट भरण्यासाठी शिवभोजन थाळी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. परंतु या शिवभोजन थाळीला मागणी अधिक आणि पुरवठा कमी असल्याने अनेक केंद्रांवरून दररोज १५ ते २० लोक उपाशी परत जात आहेत. राज्य शासनाच्या या उपक्रमाचा गरजूंना खरेच मोठा आधार झाला व त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सुटला होता. आताही शिवभोजन थाळीच्या माध्यमातून गरजूंना जेवणाची सोय सुरूच आहे. मात्र, ग्रामीण भागात दररोज ७५ थाळी एका केंद्राला एका दिवसात वाटप करण्याच्या सूचना आहेत. परंतु उपाशी राहणारे लोक थाळीभोजन करण्यासाठी आले तरी दररोज काही लोक भोजनाशिवाय खाली परत जात आहेत.शासनाने सुरु केलेल्या शिवभोजन थाळीत दोन चपात्या, एक भाजी, भात, आमटी असे पोटभर जेवण दिले जाते. सर्वसामान्यांना जरी मोफत अथवा पाच ते दहा रुपये मोजावे लागत असले तरी शासन केंद्र चालकांना ग्रामीण भागात ३५ रुपये तर शहरी भागात ४५ रुपयांचे अनुदान देत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना उत्तम प्रतीचे जेवण मिळत असल्याने ही योजना सामान्यांना दिलासा देणारी ठरली आहे. ग्रामीण भागातुन विविध कामांसाठी लवकर आलेल्या नागरिकांना शिवभोजन थाळीमुळे कमी पैशात चांगले जेवण मिळत आहे. जिल्ह्यात सुरुवातीला १३ शिवभोजन केंद्र होती. मात्र आता नागरिकांचा वाढत असलेला प्रतिसाद पाहुन राज्य शासनाने या केंद्रांची संख्या वाढविल्याने आता जिल्ह्यात एकुण ३८ केंद्रांमार्फत शिवभोजन थाळी दिली जात आहे. जिल्हास्तरावरुन अनुदान प्राप्त होताच केंद्र चालकांना अनुदान वितरीत करण्यासाठी पाठपुरावा होतो.
दररोजच्या थाळीसाठी अधिक लोकत्रिमुर्ती चौक भंडारा : शहरातील त्रिमुर्ती चौकात शिवभोजन थाळीकरिता १५ ते २० लोक अधिक येतात. परंतु थाळींची संख्या एवढे वाटप झाल्यानंतर पुन्हा वाढविण्यासाठी जेवण तयार नसते.
जिल्हा परिषद भंडारा : शासनाने दिलेल्या संख्येनुसारच जेवण तयार होत असल्याने अधिकच्या लोकांना जेवण देता येत नाही. एक-दोघे असल्यावर त्यांना जेवण समाज भावनेतून दिले जाते. परंतु जास्त लोक आले तर त्यांना जेवण देण्यासाठी तयार नसते.
रोज २००० लोकांचे पोट भरते; बाकीच्यांचे काय?
- जिल्ह्यात ३८ शिवभोजन थाळी केंद्रे आहेत. यातून जिल्ह्यातील २०७० नागरिकांना दररोज जेवणाची सोय होते.- शिवभोजन थाळीची मागणी करणारे हात अधिक आहेत. मात्र, केंद्र संचालकांना ७५ थाळींचीच परवानगी दिली आहे.