भंडारा : शहरातील लोकसंख्येसह वाहनांच्या संख्येतसुद्धा दरवर्षी सातत्याने भर पडत आहे. त्यामुळे वाहने ठेवण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याचे दिसून येते. आधीच अतिक्रमणाने बरबटलेल्या भंडारा शहरात पार्किंगसाठी जागाच नाही. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे शहरातील अपघाताच्या संख्येतसुद्धा वाढ झाली आहे.
भंडारा शहराची लोकसंख्या दीड लाखाच्या घरात आहे त्यातही वाढते नागरीकरण यामुळे दुचाकीसह चारचाकी वाहनांची संख्या सातत्याने वाढत आहे. भंडारा शहरातील सर्वाधिक अत्यंत रहदारीचा मार्ग म्हणून मुख्य मार्ग समजला जातो. याच मार्गावर सर्वाधिक वाहतूक कोंडी होत असते.
लाल बहादूर शास्त्री चौक ते बसस्थानकापर्यंत हा रस्ता अत्यंत गजबजलेला असतो. मात्र या ठिकाणी पार्किंगसाठी कुठलीही सुविधा नाही पार्किंग नसलेले शहर म्हणून भंडारा शहराची ओळख निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या भंडारा शहरात पार्किंग नसणे ही दुर्दैवी बाब म्हणावी लागेल. वारुळातून मुंग्या निघाव्यात अशी वाहनेही रस्त्यावर धावत असतात. मात्र घर किंवा दुकान बांधताना पार्किंगसाठी नियोजन केले जात नसल्याने ही समस्या भविष्यात अधिकच उग्र रूप धारण करेल, यात शंका नाही.
कारवाईसाठी पोलीस यासह स्थानिक प्रशासनाचे लक्ष असले तरी याकडे नागरिकच सर्रास दुर्लक्ष करीत असतात. वारंवार सूचना देऊनही नियमांना तिलांजली देण्याचा प्रकारसुद्धा सातत्याने घडत असतो.
बॉक्स
सम-विषम पार्किंगचा प्रयोग पूर्णत: फसला
शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी सम-विषम व वन-वे पार्किंगचा प्रयोग राबविला. मात्र, हा प्रयोगसुद्धा जास्त दिवस टिकू शकला नाही. रस्त्यावर वाहने उभे करणाऱ्यांवर वाहतूक नियंत्रण विभागाने दंडात्मक कारवाई केली. पण सम-विषम पार्किंगचा नियम कुणीही मान्य केलेला नाही.
बॉक्स
कारवाईचा अधिकार, अंमलबजावणी करणार कोण?
रस्त्यावर वाहने उभे केल्यास वाहनचालकावर कलम १२२ अंतर्गत वाहतूक नियंत्रण पोलिसांना कारवाई करण्याचा अधिकार आहे. पण याची अंमलबजावणी केल्यानंतरही तीच अवस्था दिसून येते. दुकानात आलेला ग्राहक थेट रस्त्यावरच आपले वाहने पार्क करीत असतो.
बॉक्स
महात्मा गांधी चौक ते पोस्ट ऑफीस परिसरात सर्वाधिक कोंडी
भंडारा शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या महात्मा गांधी चौक ते पोस्ट ऑफीस परिसरात या भागात सातत्याने वाहनांची वर्दळ असते. मात्र, याच भागात वाहन पार्किंगची सर्वाधिक समस्या आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करून ठेवली जातात, तर काही चारचाकी वाहन मालक आपली वाहने रस्त्याच्या कडेला उभी करून ठेवतात. त्यामुळे रस्ते अरुंद होऊन वाहतुकीची कोंडी होते. यामुळे वाहन चालक व शहरवासीयसुद्धा त्रस्त झाले आहेत. पण यावर तोडगा काढण्यात नगर परिषद आणि वाहतूक नियंत्रण विभाग सध्या तरी अपयशी ठरले आहे.