युवराज गोमासे, भंडारा: जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात व जिल्हा नियोजन कार्यालयाच्या समोरील भागात प्रसाधनगृहाचे बांधकाम करण्यात आले आहे; परंतु मागील कित्येक महिन्यांपासून येथील प्रसाधनगृहात स्वच्छतेचा अभाव आहे. मुत्रीघरात व बाहेर टाचभर लघवी साचलेली आहे. या दुर्गंधीयुक्त भागातून मार्ग काढीत शौचालयात जावे लागते. पाय ठेवायलाही मोकळी जागा नाही. जिल्ह्यात स्वच्छता मोहीम राबविण्याचा संदेश देणाऱ्यांच्या दिव्याखालीच अंधार असल्यासारखी ही स्थिती आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात येणाऱ्या नागरिकांसाठी, तसेच शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जिल्हा नियोजन कार्यालयाच्या समोरील भागात प्रसाधनगृहाचे बांधकाम करण्यात आले आहे; परंतु या इमारतीला प्रसाधनगृह म्हणावे की, दुर्गंधीचे माहेरघर हेच कळायला मार्ग नाही. या इमारतीत महिला व पुरुषांसाठी शौचालय व मुतारींची सुविधा आहे; परंतु दुरवस्था कुणालाही बघवणार नाही.
परिसरात घाणीचा उग्र वास असतो. नाकाला रुमाल बांधल्याशिवाय येथूून जाता येत नाही, इतकी वाईट परिस्थिती आहे. प्रसाधनगृहातील लघवी बाहेर निघण्याचे मार्ग बंद पडल्याने घाण पाणी तिथेच साचून असते. यामुळे पाय ठेवायलाही मोकळी जागा नसते. इमारतीच्या व्हरांड्यातही टाचभर लघवी साचून आहे. त्यामुळे येथे शौचास जाणाऱ्याला टाचभर लघवी साचलेल्या ठिकाणाहून मार्ग काढीत शौचालयात जावे लागते. मागील अनेक दिवसांपासून कुणीही याकडे लक्ष देताना दिसत नाही.