भंडारा : कुणीतरी आवाज दिला. सामान ठेवा, बाळाले घेऊन खाली उतरा. पहिले वाटलं चोर आला असंल. मग आग लागल्याचं सांगितलं. बाळ हातात अन् सिजर झालेल्या ओल्या बाळंतिणीला खाली ओढतच आणलं. कारा - कारा धूर होता, हातापायाले काटे आले होते, असे प्रसूतीपश्चात कक्षात असलेल्या बाळंतिणींच्या नातेवाइकांनी त्या काळरात्रीचे वास्तव ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विशेष नवजात अतिदक्षता कक्षात शनिवारी पहाटे दोन वाजता भीषण आग लागली. या आगीत १० निष्पाप बाळांचा बळी गेला. या विशेष नवजात अतिदक्षता कक्षालगतच वाॅर्ड क्रमांक ११ अर्थात प्रसूतीपश्चात कक्ष आहे. या कक्षात सात माता आपल्या नवजात बाळांसह शुक्रवारी रात्री झोपी गेल्या होत्या. सोबत त्यांचे नातेवाईकही होते. रात्री दोन वाजताच्या सुमारास अचानक गोंधळ उडाला. वाॅर्डातील सर्व बाळंतिणी आणि माता खडबडून जाग्या झाल्या. देशाला हादरवून टाकणाऱ्या या घटनेच्या साक्षीदार ठरलेल्या रंजना राजेश शेबे, रा. कवडसी (पालांदूर) त्या रात्रीचे अंगावर काटे आणणारे वास्तव सांगत होत्या. त्यांची मुलगी पूजा विजय बांते, रा. सीपेवाडा, ता. लाखनी हिला ८ तारखेला सायंकाळी सहा वाजता मुलगी झाली. तिला प्रसूतीपश्चात कक्षात ठेवले होते. त्यांची आई रंजना सांगत होती, माणसाला माणूस दिसत नव्हता एवढा धूर होता. जिवाचा थरकाप उडत होता. आमच्या हातापायाला काटे आले होते.
भंडारा तालुक्यातील इटगाव येथील सोमनाथ चौधरी यांच्या पत्नीही याच कक्षात दाखल होत्या. ७ तारखेला मुलगा झाला होता. रात्री आम्ही झोपलो होतो. आग लागल्याचे कळले. सीजर झालेल्या पत्नीला ओढत ओढत पायऱ्यांवरून खाली आणले. बाळालाही सुरक्षित बाहेर काढले, असे तो सांगत होता. लाखनी तालुक्यातील गराडा येथील गौरी विशाल मेश्राम या दुसऱ्या बाळंतपणासाठी येथे दाखल होत्या. ८ जानेवारीला सकाळी ९.३० वाजता त्यांना मुलगा झाला. त्यांच्यासोबत त्यांची आई मंजू पटले होत्या. त्यांनी अनुभवलेले वास्तव कुणाच्याही अंगावर काटे आणण्यासारखे आहे. किंकाळ्या आणि ओरडण्याच्या आवाजाने दवाखाना दणाणून गेला होता. सर्वत्र धूर पसरला होता. मोठी धावपळ सुरू होती. कोण कुणाला काय झाले ते सांगायला तयार नव्हते.
बाॅक्स
हाताच्या सलाईन काढून फेकल्या
प्रसूतीपश्चात कक्षात सात बाळंतिणी उपचारासाठी दाखल होत्या. त्यांच्यासोबत त्यांचे नवजात बालकही होते. या महिलांना रात्री परिचारिकांनी सलाईन लावल्या होत्या. सोबत नातेवाईकही होते. अचानक आग लागल्याचे माहीत झाले. जीव वाचविण्यासाठी पटापट हाताच्या सलाईन काढून फेकल्या आणि जीव वाचवत खाली आल्या.
बाॅक्स
नेत्र कक्षात केली बाळंतिणीची व्यवस्था
शनिवारच्या पहाटे झालेल्या अग्नितांडवानंतर प्रसूतीपश्चात कक्षात असलेल्या सात मातांची व्यवस्था रुग्णालयातील नेत्र विभागात करण्यात आली आहे. या मातांना त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. मात्र, या कक्षाचा दरवाजा तुटलेला आहे. रात्रभर नातेवाईक तेथे जागता पहारा देत असतात. सोमवारी सकाळी दहा वाजता नातेवाईक या नेत्र कक्षासमोर बसून याच घटनेची चर्चा करीत होते. प्रत्येकजण हळहळ आणि रुग्णालय प्रशासनावर संताप व्यक्त करीत होते.