हरिश्चंद्र कोरे ।लोकमत न्यूज नेटवर्कविरली (बु.) : लाखांदूर तालुक्यातील परसोडी (नाग) येथील नागमंदिरात सर्पदंशाच्या अनेक रुग्णांना जीवनदान मिळाले असून सापाचे विष निष्प्रभ करण्याची या मंदिराची महिमा अद्याप कायम आहे. नागपंचमीनिमित्त या मंदिरात भव्य यात्रेचे आयोजन केले जाते. यात्रेत परिसरातील हजारो भाविक आपापल्या गावातील दिंड्यासह सहभागी होवून नागदेवतेचे दर्शन घेतात.नागराजाने या गावाला दिलेल्या वरदानाबद्दल एक आख्यायीका प्रसिद्ध आहे. एका शेतकऱ्याची पत्नी टोपलीमध्ये शिदोरी घेऊन शेतावर जात होती. याच वेळी नागराजाला पकडण्यासाठी काही गारूडी त्याच्या मागे लागले. ते पाहून नागराज सैरावैरा पळू लागला.दरम्यान, त्याला टोपलीत शिदोरी घेऊन जाणारी महिला दिसली. त्याने तिला आपल्या टोपलीत आश्रय देऊन त्याच्या मागावर असलेल्या गारूड्यांपासून बचाव करण्याची विनंती केली. शेतकºयांच्या पत्नीने नागराजाची विनंती मान्य करून त्याला आपल्या टोपलीत आश्रय देऊन लपविले.नागराजाचा पाठलाग करणाºया गारूड्यांनी तिला नागराजाबद्दल विचारले. तेव्हा तिने नागराज तिकडे पळाल्याचे सांगून त्यांची दिशाभूल केली आणि नागराजाचे गारूड्यांपासून रक्षण केले. शेतकºयांच्या पत्नीने गारूड्यांपासून रक्षण केल्यामुळे नागराज त्या महिलेवर प्रसन्न झाले आणि तिला इच्छीत वर आणण्यास सांगितले. तेव्हा त्या शेतकरी महिलेने, माझ्या गावाची सीमा तुझ्या विषापासून मुक्त कर, असा वर मागितला. नागराजाने तथास्तू म्हटले.तेव्हापासून सर्पदंशाचा रुग्ण या गावाच्या सीमेत पोहचला तरी त्याला जीवनदान मिळते. परिसरातील जनतेमध्ये या मंदिराविषयी अपार श्रद्धा असून भाविकांच्या श्रद्धेला अद्याप तडा गेलेला नाही. लाखांदूर, पवनी तालुक्यातील अनेक सर्पदंशाचे रुग्ण या मंदिराच्या आशिर्वादाने ठणठणीत झाले आहेत. विशेष उल्लेखनीय म्हणजे या गावाच्या सीमेत एकही आंब्याचे झाड नाही आणि नवीन आम्रवृक्षही या गावाच्या सीमेत जगत नाही.नागपंचमीला परिसरातील अनेक गावातील हजारो भाविक आपापल्या गावापासून दिंडी घेऊन येतात आणि यात्रेत सहभागी होऊन नागदेवतेचे दर्शन घेतात. यावर्षी जुलै महिन्यापासून आजपर्यंत या नागमंदिरात १२ रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यापैकी नऊ रुग्ण तंदुरूस्त होऊन परत गेले तर विश्वनाथ उके (२५) रा. भागडी, अर्जून मेश्राम (४७) रा.अत्री, सुनिता वरठे (४०) रा. साकोली या तीन रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती नागमंदिर देवस्थानचे अध्यक्ष विठ्ठल मेहंदळे यांनी दिली.
'तिथे' सापाचे विषही होते निष्प्रभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 11:00 PM
लाखांदूर तालुक्यातील परसोडी (नाग) येथील नागमंदिरात सर्पदंशाच्या अनेक रुग्णांना जीवनदान मिळाले असून सापाचे विष निष्प्रभ करण्याची या मंदिराची महिमा अद्याप कायम आहे. नागपंचमीनिमित्त या मंदिरात भव्य यात्रेचे आयोजन केले जाते. यात्रेत परिसरातील हजारो भाविक आपापल्या गावातील दिंड्यासह सहभागी होवून नागदेवतेचे दर्शन घेतात.
ठळक मुद्देनागपंचमी विशेष : परसोडी (नाग) येथील नागमंदिराची महिमा