धोका : जीवंत विद्युत तारेचा करतात वापर प्रमोद प्रधान लाखांदूरमासे पकडण्यासाठी युवकांनी नवीन युक्ती शोधून काढली. नदी, नाल्यातील कमी पाण्यात जिवंत विद्युत तार सोडून माशांना पकडणे सहज सोपे असले तरी हा सर्व प्रकार जिवावर बेतणारा आहे. यावर संबंधित विभागाने चौकशी करून कार्यवाही करणे गरजेचे आहे.उन्हाळ्याच्या दिवसात नदी, नाल्यातील पाणी कमी होते. याचाच फायदा घेत ग्रामीण भागातील विद्यार्थी व युवक वर्ग मासे पकडण्यासाठी जातात. चुलबंद नदी व नाल्यात अशावेळी मासे पकडणे सहज सोपे जाते. अशातच जवळच्या जिवंत विद्युत तारांचा वापर करून काही विद्यार्थी पाण्यात सोडतात. जिवंत विद्युत तार पाण्यात पडताच मासे वर येतात व मृत्यू मुखी पडतात. नंतर मासे पकडले जातात. यावेळी अनावधानाने जिवंत विद्युत तार पाण्यात पडली तर पाण्यातील उभे असलेले सर्व मासे पकडणारे मृत पावल्याची शक्यता नाकारता येत नाही. हा सर्व प्रकार गंभीर असूनही तालुक्यातील चुलबंद नदी काठावरील विद्यार्थी व युवक वर्ग नदीवर मासे पकडण्यासाठी जाताना दिसतात. यापूर्वी तालुक्यात असाच प्रकार सुरू असताना एका शाळकरी विद्यार्थ्यांचा जिवंत विद्युत तार मासे पकडण्यासाठी सोडताना मृत्यू झाल्याची घटना घडली होती. संबंधित विद्युत विभागात दांडेगाव, कोच्छी, जैतपूर, खोलमारा या भागात चौकशी करून त्यांचेवर कार्यवाहीची मागणी केली आहे. जेणे करून अपघात टाळता येवू शकेल.
'ते' जीव धोक्यात टाकून पकडतात मासे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2016 3:49 AM