भंडारा : दार ठाेठावून पप्पाचा मित्र आहे असे सांगत एका भामट्याने घरात प्रवेश केला. मुलाला चाॅकलेट दिले आणि अवघ्या दहा मिनिटात घरातून तीन लाख ७७ हजार रुपयांचे साेन्याचे दागिने पळविले. ही घटना भंडारा शहरातील सहकार नगरात गुरुवारी (दि. २१) दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेची तक्रार भंडारा ठाण्यात रात्री ११ वाजता देण्यात आली. पाेलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून चाेरट्याचा शाेध सुरू केला आहे.
लक्ष्मण चितुलाल कटरे (३९) यांच्याकडे भाड्याने राहत असलेल्या घरीत चाेरी झाली. ते मूळ गाेंदिया जिल्ह्यातील वघाेली येथील रहिवासी आहेत. येथील श्रीराम फायनान्स कंपनीत ब्रँच मॅनेजर असून, त्यांनी सहकार नगरातील सुधाकर भुरे यांच्याकडे भाड्याने राहतात. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते कार्यालयात गेले. पत्नीने मुलाला शाळेतून आणले आणि त्या दुपारी १ वाजेच्या सुमारास ब्यूटिपार्लरच्या क्लाससाठी बाहेर गेल्या. त्यावेळी सहा वर्षाचा मुलगा विनय हा एकटाच घरी हाेता.
काही वेळात कुणीतरी दारावर थाप मारली. पप्पाचा मित्र आहे असे सांगितले. त्याने खिडकीतून बघितले तेव्हा कुणी दिसले नाही. त्यामुळे दार उघडले तेव्हा एक व्यक्ती दारात उभा हाेता. मी तुझा पप्पाचा मित्र आहे असे म्हणत घरात शिरला. त्याने विनयला चाॅकलेट दिले. विनयला साेफ्यावर बसण्यास सांगितले. त्याच्यासाेबत गप्पा मारत दार आतून बंद केले. बेडरूममध्ये जाऊन खिळ्याला लटकविलेल्या पर्समधून तीन लाख ७७ हजार ६६० रुपयांचे साेन्याचे दागिने लंपास केले.
काही वेळात विनयला संशय आला त्याने आरडाओरडा केला. भामटा पसार झाला. शेजारी धावून आले. तेवढ्यात आईही आली. घरात जाऊन बघतात तर चाेरी झाल्याचे लक्षात आले. पती लक्ष्मण कटरे यांना माहिती दिली. त्यांनीही घरी धाव घेतली. या घटनेची माहिती पाेलिसांना देण्यात आली. पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याप्रकरणी रात्री ११ वाजता भंडारा ठाण्यात गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास ठाणेदार सुभाष बारसे यांच्या मार्गदर्शनात पाेलीस उपनिरीक्षक कराळे करीत आहेत.
मीटिंगमध्ये असल्याने वडिलांनी उचलला नाही फोन
लक्ष्मण कटरे हे श्रीराम फायनान्समध्ये ब्रॅन्च मॅनेजर असून त्यांची गुरुवारी बैठक होती. बैठक आटोपून ते २ वाजेपर्यंत घरी येणार होते; परंतु बैठक लांबली. विनयने घरी आलेल्या व्यक्तीची माहिती देण्यासाठी वडिलांना फोनही केला. परंतु, मीटिंगमध्ये व्यस्त असल्याने त्यांनी फोनही उचलला नाही आणि इकडे चोरट्याने डाव साधला.