१,५२८ ब्रास रेती साठा : पांजरा व आष्टी रेती साठ्याचा समावेश, संबंधितांवर कारवाईची गरजमोहन भोयर तुमसरतुमसर तालुक्यातील वैनगंगा व बावनथडी नदी पात्रातून नियमबाह्य अवैध रेती उत्खनन करण्यात आली. आष्टी व पांजरा (रेंगेपार) नदी काठावर सुमारे १५२८ ब्रास रेती डम्पींग करण्यात आली. त्या रेतीचा महसूल प्रशासन दि. १९ नोव्हेंबरला लिलाव करीत आहे. दीड हजार ब्रास रेती डम्पींग कुणी केली याचा सुगावा मात्र महसूल प्रशासनाला लागला नाही. येथे संबंधित रेती डम्पींग करणारे व तलाठी तथा मंडळ अधिकाऱ्यावर कारवाईची गरज आहे.भंडारा जिल्ह्यातील रेती घाटाची दि. ३० सप्टेंबरपर्यंत मुदत होती. जिल्ह्यात एकूण २९ रेतीघाटांचा लिलाव करण्यात आला होता. वैनगंगा व बावनथडी नदीपात्रातील रेती शहरात मोठी मागणी असून ती उच्च दर्जाची रेती आहे. पावसाळा सुरु होण्यापूर्वी नदी घाटाच्या काठावर हजारो ब्रास रेतीचा साठा करून ठेवण्यात आला होता. काही साठा हा शासकीय जागेवर तर काही साठा खासगी शेतीत करण्यात आला. तुमसर तालुक्यातील पांजरा (रेेंगेपार) नदी काठावर वनविभागाच्या जमिनीवर (झुडपी जंगल) विना परवानगीने नियमबाह्यपणे पांजरा (मोहगाव खदान) गट क्रमांक १३२ मध्ये १०-२८ हेक्टर मधील ०.२३१ हेक्टर आर जागेवर ५२८ ब्रास रेती साठा (रोपवन जागेवर) करण्यात आला. सुमारे २३१० घनमिटर ही रेती आहे. महसूल प्रशासनाने रेती साठ्याची किंमत ७ लाख ९२ हजार इतकी आकारली आहे. याकरिता लिलावात सहभागी होणाऱ्याला १ लाख ९८ हजार रुपये अनामत रक्कम जमा करावी लागणार आहे. आष्टी येथे बावनथडी नदी पात्रातून अवैध रेती उत्खनन करून सुमारे ७०० ब्रास रेती नदी काठावरील खासगी शेतजमिनीत गटक्रमांक २१७५ मध्ये साठा करून ठेवला आहे. महसूल प्रशासनाने या रेतीसाठ्याची किंमत १० लाख आकारली आहे. येथे अनामत रक्कम सुमारे दोन लक्ष इतकी ठेवली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी एका ब्रासची किंमत १५०० रुपये येथे निश्चित केली आहे. पांजरा (रेंगेपार) येथील वनविभागाच्या रोपवन तयार करण्यात येणाऱ्या जागेवर रेती साठा करून ठेवला. वनविभागाने तुमसर तहसीलदारांना या रेतीचा लिलाव करावा असे पत्र दिले.आष्टी येथील रेती साठा एका खासगी शेतीत करून ठेवण्यात आला. त्या शेतकऱ्याने तहसीलदारांना निवेदन देवून रेतीची तात्काळ विल्हेवाट लावण्याची मागणी केली. नदीपात्रातून रेती उत्खनन करून प्रचंड मोठा रेतीसाठा राजरोसपणे करण्यात आला. परंतु तो कुणी केला याची माहिती कुणालाच नाही. हे एक मोठे आश्चर्य आहे. राज्य शासनाच्या नियमानुसार संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे.महसूल प्रशासनाचे गावातील तलाठी, मंडळ अधिकारी तथा गावातील ग्रामसेवक यांना याबाबत माहिती नाही असे समजते. तलाठ्यांच्या अहवालानुसार महसूल प्रशासन लिलाव करते. वनविभागही याबाबत अनभिज्ञ आहे हे विशेष. बाम्हणी रेती घाटावरील काठावर सुमारे ६५०० ब्रास रेतीचा साठा आहे.
चोरट्या रेती साठ्याचा तुमसरात होणार लिलाव
By admin | Published: November 17, 2015 12:36 AM