भंडारा : कोरोना महामारीने सर्वांना त्रस्त करून सोडले आहे. बेरोजगारी, वाढती महागाई व अन्य सामाजिक कारणांनी भंडारा जिल्ह्यात १३ जणांनी आत्महत्या केली. अशा कुटुंबांना किंवा भविष्यात अशा घटना होऊ नयेत म्हणून भावनिक व आर्थिक आधार देण्याची गरज निर्माण झाली आहे.
बुद्धिवंतांनाही याबाबतीत विचार करावा, अशी वेळ आता येऊन ठेपली आहे. कोरोनाकाळात अनेक बेरोजगार झाले. उद्योगधंदेही डबघाईस आले. कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना अनेकांना मानसिक, आर्थिक व भावनिक त्रासही सहन करावा लागला. मात्र या काळात १३ जणांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारत इहलोकाचा निरोप घेतला. अशा कुटुंबांना आता मदतीचा हात देण्याची गरज आहे. किंबहुना आगामी काळात अशी स्थिती उद्भवू नये म्हणून भावनिक व आर्थिक आधार देण्याची नितांत गरज आहे. समाजातील उच्चभ्रू व दानशूर व्यक्तींनी या संबंधाने समोर येण्याची गरज आहे.
बॉक्स
हे दिवसही जातील
कोरोनासंकट काळात काहींना एकावेळचे जेवणही उपलब्ध झाले नाही. परंतु त्यांनी आस सोडली नाही. हे कठीण दिवसही जातील, अशी त्यांना आशा होती. जीवन आता पूर्वपदावर येऊ लागले आहे. मात्र गेलेला काळ हा खूप कठीण होता, असे त्यांचे मनोगत आहे.
बॉक्स
कुटुंबाने काळजी घेण्याची गरज
मानव हा सामाजिक प्राणी आहे. कुटुंब ही त्याची जबाबदारी असली, तरी आपुलकीची माणसे घरातच मिळतात. अशावेळी भावनिक व मानसिक त्रासात सापडलेल्या घरातील सदस्यांना कुटुंबाने काळजी घेण्याची नितांत गरज आहे.
बॉक्स
मानसोपचार तज्ज्ञ काय म्हणतात
मानवी जीवन क्षणभंगूर आहे. समस्यांतून सकारात्मक दिशेने विचार करून जीवनाचे एक-एक पाऊल समोर टाकावे लागते. आलेले संकट निघून जाते, मात्र त्यावेळी दिलेला मदतीचा व भावनिक आधार जन्मभर आठवणीत राहतो. अशावेळी त्या व्यक्तीला भावनिक आधार देण्याची खूप गरज आहे. नेमक्या वेळी त्याला शब्दरूपी भावनांची साथ मिळाली, तर त्याच्या मनात कदाचित आत्महत्येसारखा विचारही येणार नाही.
डॉ. रत्नाकर बांडेबुचे, मानसोपचार तज्ज्ञ, भंडारा.